फायनली ‘तुझ्याविना’ची प्रतिक्षा संपली…

Tuzyavina

‘तुझ्याविना’ हा हृदयाच्या खूप जवळचा प्रोजेक्ट होता. तो हातावेगळा झाला याचे समाधान आहे.

मनोगत

मुळात विनोदी लिहीणार्‍या माणसाने प्रेमकथा लिहायची की नाही हा वादातीत विषय आहे, पण मी ती लिहीली. स्वत:ला काहीतरी चॅलेंज म्हणून ‘तुझ्याविना’ लिहायला घेतली. कथेचा भाग लिहून झाला की एका मराठी प्लॅटफॉर्मवर अपलोड करत होतो. विषेश म्हणजे वाचकांना ही कथा खूप आवडू लागली आणि तशा प्रतिक्रियाही येऊ लागल्या. कधी कामाच्या व्यापामधून एखादा भाग लिहायला उशिर झाला तर वाचक “पुढचा भाग केव्हा अपलोड करणार?” म्हणून हैराण करून सोडायचे. नुसता मेसेजच नाही, तर एखादा विनोदी लेख लिहीला की त्याच्या कॉमेंटमध्ये ‘तुझ्याविना’ बद्दल विचारपूस व्हायची.

‘तुझ्याविना’ किंडलवर प्रकाशित करायची हे ठरल्यावर मी तिथून ती अप्रकाशित केली. तरीही काही नियमित वाचक ‘तुझ्याविना’ दुसर्‍यांदा वाचायची आहे, पण इथे दिसत नाही, असे मेसेज करायचे. वाचकांनी या कथेवर इतके प्रेम केले की विचारायची सोय नाही. सेकंडलास्ट पार्ट लिहील्यावर तर मेसेजचा लोंढा आवरता आवरता माझी पुरेवाट झाली. वाचक समीर आणि आर्याच्या एवढ्या प्रेमात पडले होते की त्यांना तो ट्विस्टवाला भाग आवडला नाही, आय मीन – त्यांना तो पचनी पडणे शक्य नव्हते आणि त्याची मला पूर्णपणे कल्पणा होती. हे वळण आम्हांला नकोय, नाहीतर आम्ही तुमची कोणतीही कथा यापुढे वाचणार नाही, चक्क अशा प्रेमळ धमक्याही मिळाल्या.

त्यानंतर खूप प्रेशरमध्ये होतो, पण शेवटी मला तारेवरची कसरत करावी लागली आणि फायनली ती सर्वांना आवडली. त्या सार्‍या गोष्टींचा तपशील मी इथे मांडत बसत नाही. पण काही निवडक प्रतिक्रिया मात्र मुद्दाम द्याव्याशा वाटल्या त्या दिलेल्या आहेत. पण कित्येक वर्षे मनात घर करून असलेली ही दोन पात्रे पुस्तकात बंद केल्यावर आयुष्यात एक प्रकारचा एम्प्टीनेस आलाय! आता ती केवळ माझी पात्रे नाहीत. हजारो वाचकांप्रमाणेच ती तुमचीही होऊन जातील यात शंकाच नाही.

पण एक मात्र खरं आहे, ‘तुझ्याविना’ने मला हजारो वाचकापर्यंत पोहोचवले. त्यातले काही खूप चांगले मित्र झाले, काही शुभचिंतक आणि उरलेले जेन्यून वाचक! त्यांनी माझ्या लेखनावर मनापासून प्रेम केले आणि मला लिहीते ठेवले. ‘तुझ्याविना’ लिहीतानाचे ते सात महिने, चौतीस भाग आणि असंख्य वाचक! तो प्रवास खरोखर मंतरलेला होता. या प्रेमकथेचा शेवट करायला ‘व्हॅलेंटाईन डे’ मात्र मुहुर्तासारखा अवचित मिळाला.

असो, तुम्हालांही समीर आणि आर्याची ही कथा नक्की आवडेल आणि बराच काळ ती तुमच्या मनात रेंगाळत राहील याची मला खात्री आहे. या ब्लॉगवरून मी ‘तुझ्याविना’ लिहीत होतो. तुम्हांला ती आवडली असेलच, तुमच्या मित्रमैत्रीणींना आणि वाचनाची ज्यांना आवड आहे, त्यांना नक्की ‘तुझ्याविना’ रेकमंड करा.लेखनाबद्दल तुमच्या काहीही प्रतिक्रिया असल्यास मेलवर मला आपलेपणाने कळवू शकता.

‘तुझ्याविना’ किंडल लिंक :

काही निवडक प्रतेिक्रया

‘तुझ्याविना’ ही अतीव सुंदर व अनोखी कादंबरी वाचून पूर्ण झाली. वाचताना मनाला जे भावले त्याची पोच द्यावी यासाठी हा पत्रप्रपंच. कथेच्या प्रारंभापासून नायकाच्या भावविश्वाचे चित्रीकरण पाहतेय की काय असं वाटतं. समीर स्वत: त्याची गोष्ट सांगतोय इतपत ते खरं वाटतं. त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व, देहबोली कशी असेल, आर्याच्या प्रेमाला जिंकण्याची त्याची धडपड, त्यासाठी त्याने केलेली खास तयारी, त्याचं तिला विशिष्ट नावानी संबोधणं..सगळंच अफलातून! कथेच्या शेवटाकडे जेव्हा आर्याची डायरी समीरकडे असते त्यातून तिच्या भावविश्वातील उकल तेवढ्याच समर्थपणे अभिव्यक्त होते.. आवर्जून उल्लेख करावा लागेल ते कॉपोरेट जग आणि ऑफिसमधील कामाचे तपशील बारकाईने मांडले आहेत. लेखनकौशल्यावर बोलायचं तर ते परिपूर्ण, परिपक्व असं. म्हणजे प्रसंगातील, संवादातील सुसूत्रता…सलगपणे लिहीलंय सगळं. कथेत कुठंही विस्कळीतपणा वा ओढून ताणून आणलेले प्रसंग नाहीत हा तुमच्या लिखाणाचा युएसपी! एकंदरीत सगळं प्रशंसनीय आहे म्हणून हा अभिप्राय! – हर्षदा.

तुझ्याविना – अतिशय सुरेख मांडणी. इथे वाचलेल्या तर्कशुद्ध आणि प्रवाही अशा मोजक्या कथांपैकी एक कथा. शेवट एकदम अनपेक्षित असला तरी फिल्मी वाटला नाही हे तुमच्या लिखाणाचे वैशिष्ठ्य. ऑफिसमधले सगळेच प्रसंग खरे वाटावेत इतके छान लिहीलेत. प्रेमकथा म्हणून उगाच गुडी-गुडी, प्रेमात बुचकळलेले प्रसंग नव्हते – रवी.

‘तुझ्याविना’ वाचताना मी अक्षरश: कथा जगत होते. वाटलेच नाही की कथा वाचतेय. आयुष्यात बर्‍याच गोष्टींचा अनुभवही घेतलेला, त्यामुळे ही आपलीच स्टोरी आहे असे सतत वाटत होते – दिपाली.

तुम्ही आम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’चे खूप भारी गिफ्ट दिले. समीरचे दु:ख कल्पनेपलिकडचे होते. खरंच आपल्या जीवलगाशिवाय जगण्याची कल्पनाच करवत नाही. तुम्ही खूप छान लिहीता, एखाद्या गोष्टीचे विस्तृत वर्णन करता. वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लोकांना इंजिनियरिंगमधले काय माहित असणार? पण तुमच्यामुळे आम्हांला थोडीफार माहिती मिळाली. पण आजचे सरप्राईज खूप आवडले. तुमच्या नवीन कथेच्या प्रतिक्षेत – माधवी.

इथल्या काही निवडक भावलेल्या कथांपैकी एक ‘तुझ्याविना’. समीरच्या नजरेतून कथा अक्षरश: जगता आली. प्रेमात पडलेल्या, उत्कट प्रेम असूनही रागात अबोला धरलेल्या व्यक्तीचे इतके सुरेख आणि रिअलिस्टीक सादरीकरण. तुमच्या लेखनशैलीचे करावे तितके कौतूक कमीच आहे. हॅट्स ऑफ टू यू… किप रायटिंग! – लेखा.

मला इंजिनियरिंग फिल्डचे काही ज्ञान नाही पण तुमच्या डिटेल लिखाणातून ते बर्‍यापैकी समजले. आर्या आणि समीरची जोडी खरंच भारी होती. आर्या इतकी चंचल, बिनधास्त तर समीर तिच्या उलट शांत, डेडिकेटेड असा. वेळोवेळी त्यांच्यातला रोमांस, गैरसमज, दोघांनी सहन केलेला एकमेकांचा विरह, पुन्हा एकत्र येणं खूप छान पद्धतीने मांडलेय. विशेषत: सेकंड लास्ट भाग वाचताना मनाची घालमेल होत होती. त्या भागाचा शेवट वाचून तर फूल ब्लँक झालेले. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की तुम्ही मुलींवर खूपच रिसर्च केलेला दिसतोय! कोणत्यावेळी त्या कशा रिअॅक्ट करतील, त्यांच्या मनात काय चाललेय याचे अगदी तपशीलात वर्णन केलं आहे. कथेची मांडणी खूपच उत्कृष्ट केलीय. कायम असेच लिहीत रहा. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा! – शितल.

अप्रतिम कथा. मी सगळे भाग सलग वाचल्यामुळे सर्व भागांवर प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. पण खरंच या दोन दिवसांत मी ही समीर आणि आर्यासोबत जोडले गेले. खूपच छान लिखाण केलंय तुम्ही. तुम्हांला भाषेची चांगली जाण आहे. कथेची मांडणी व्यवस्थित आणि मुद्देसूद आहे. कुठेही दिखावा किंवा अतिशयोक्ती नाही – दिपिका.

ओह माय गॉड! सेकंड लास्ट पार्ट वाचल्यावर किती टेन्शन आलेले! त्यावरच्या माझ्या कॉमेंटबद्दल खूप सॉरी! तुम्हांला माहितच आहे समीर आणि आर्यावर आमचा किती जीव होता. त्यांच्यावरच्या प्रेमपोटीच हे सगळं लिहीलं गेलं. खूप छान कथा होती! पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! – संजना.

शेवटचा पार्ट भीतभीतच ओपन केला पण एवढे भारी गिफ्ट मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. खूप छान! आधीचा पार्ट वाचल्यावर तुमचा भयंकर राग आलेला पण समीर आणि आर्या खूप छान होते. अशाच कथा अजून पुढे वाचायला आवडतील – पुजा.

एकदम जबरदस्त! कोणत्याही शब्दांत तुमचं कौतूक करावं तितकं कमीच आहे. सलग चार तास एकाच जागेवर बसून तहानभूक विसरून कादंबरी वाचून काढली. फाईव्ह स्टारपेक्षा जास्त स्टार देण्याची सुविधा असती तर नक्कीच दिले असते – दत्ता.

खरं म्हणजे मागचा भाग वाचल्यानंतर आजचा शेवटचा भाग – आणि तो ही ‘व्हॅलेंटाईन डे’ला वाचायची माझी हिंमतच होत नव्हती पण तो वाचल्यावर झालेला आनंद शब्दांत सांगू शकत नाही. आर्या आणि समीरला आम्ही खूप मिस करणार आहोत. तुमची नवीन कादंबरी लवकर सुरु करा – हेमा.

खूप सुंदर – म्हणजे एकदम परफेक्ट लव्ह स्टोरी. शेवटचा भाग वाचला म्हणून बरे, नाहीतर परत कोणती लव्ह स्टोरी वाचायची हिंमत झाली नसती. तुमचे लेखन खूप प्रभावशाली आहे कारण वाचताना मी स्वत: ती स्टोरी जगले आहे. मागचा भाग वाचून खूप दडपण आले होते पण शेवटचा भाग वाचून तेवढाच आनंद झाला. अप्रतिम लेखनशैली – ऐश्वर्या.

शेवट खूप गोड होता. असंही होऊ शकतं याचा विचारही केला नव्हता मी. हे सगळं एक उत्कृष्ट लेखकच करू शकतो. अशाच नवनवीन कथा लिहीत रहा. आम्ही वाट पहातोय – मधुरा.

एका दिवसात सगळे भाग वाचून संपवले. समीर आणि आर्याच्या आयुष्यातील चढउतार स्वत: जगतोय असे वाटत होते. कथेतील ससपेन्सने डोके व्यापून टाकले होते. असेच लिहीत रहा आणि या कादंबरीचा पुढचा भागही लवकर लिहा, ज्यात समीर आणि आर्याच असतील – हर्षल.

सर, मी अक्षरश: ब्लँक झालीये. या क्षणाला मी किती खुश आहे याची तुम्हांला कल्पनाही करता येणार नाही! पण हा शेवटचा भाग म्हटल्यावर ही क्यूटवाली लव्हस्टोरी मी नक्की मिस करेन! – निगार.

सेकंडलास्ट पार्ट वाचल्यावर खरे तर तुमचा खूप राग आलेला. त्यामुळे रागात मी त्यावर प्रतिक्रियाही लिहीली नव्हती. पण मनामध्ये एक अंधूक आशा होती की कदाचित हा शेवट नसावा या कथेचा. आणि हा पार्ट वाचल्यावर तर खूपच खुश झाले! एवढी छान स्टोरी लिहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद! – रक्षा.

सर्व भाग व्यवस्थित वाचून मगच प्रतिक्रिया लिहीली आहे. ‘तुझ्याविना’ खरोखर एक परफेक्ट पॅकेज आहे. इमोशन्स, प्रिचींग…टू गुड! – मनिष केतकर.

हॉस्पिटलमधला प्रसंग खूप छान पद्धतीने मांडलाय. माणूस कसा असावा हे आर्याने दाखवून दिले. या कादंबरीचा दुसरा भाग लिहीला तर खूप छान होईल! – गुलाब.

थँक्यू सो मच! ही कथा सदैव माझ्या हृदयात राहील – प्राजक्ता.

खूप सुंदर! आर्या आणि समीर यांची स्वीट आणि सॉल्टी लव्हस्टोरी खूप आवडली. दोघांचे एकमेकांशी असलेले समर्पित भाव खूपच आवडले. प्रेमी कसे असावेत याचे ‘तुझ्याविना’ हे एक उत्तम उदाहरण आहे – मनिषा.

जीव लावणारे लिखाण केलं आहे. दगडालाही पाझर फुटेल, मग आम्ही तर माणसं आहोत – हेमकांत.

काय लिहू समजत नाहीये. कथेत पहिल्यापासून चढउतार होते पण अचानक कथा असे वळण घेईल असे वाटले नव्हते – ऐश्वर्या गडकरी.

‘अप्रतिम’ यापेक्षा दुसरा शब्दच नाही व्यक्त होण्यासाठी – अभिजित.

…आणि अशा अनेक प्रतिक्रिया आहेत ज्या जागेअभावी मला इथे देता येत नाहीत. पण वाचकांनी ‘तुझ्याविना’वर अतोनात प्रेम केले आहे. मी त्यांचा मनापासून शतश: आभारी आहे.