टवाळा आवडे विनोद

‘टवाळा आवडे विनोद’ या सुप्रसिद्ध म्हणीचे ओरिजिनल लेखक दुसरे तिसरे कोणी नसून श्री. नारायण ठोसर आहेत. भटजीने “शुभमंगल सावधान…” असे म्हणताच मंडपातून धुम पळालेले नारायण ठोसर म्हणजेच समर्थ रामदास एक शिवकालीन संत होते. त्यांच्या समकालीन संतांचा समाजातील लोक खूप छळ करायचे. ते काही लिखाण वगैरे करत असतील तर त्यांच्या वहया नदीत बुडवायचे. त्यांना त्रास दयायचे, त्यांच्या दुकानातून सामान पळवायचे. पण समर्थ रामदास नेहमी जिममध्ये जात असल्याने त्यांच्या नादी कोण लागत नव्हते. त्यांचे “मनाचे श्लोक” हे पुस्तक जाम गाजलेले आहे. पण हे हलके फुलके पुस्तक लिहीणार्‍या समर्थांना विनोद का आवडत नव्हता हे एक कोडेच आहे.
दंड, बैठका, सुर्यनमस्कारांनी तयार झालेले शरीर आणि हातातली कुबडी पाहून त्यांना “तुम्हांला विनोद का आवडत नाही?” किंवा “तुम्ही विनोद करणार्‍यांवर खार खाउुन का असता?” असे विचारण्याचे धाडस करणारा मुर्खच ठरला असता. त्यांच्या ‘दासबोध’ या अजून एका गाजलेल्या ग्रंथात त्यांनी मुर्खांची लक्षणे नमूद केली आहेत. थोडक्यात म्हणजे फिदीफिदी हसणार्‍यांवर त्यांची करडी नजर होती.
आज समर्थ असते तर आमची काही खैर नव्हती. आम्हांला विनोद आवडतो म्हणजे आम्ही टवाळ इथपर्यंत ठीक आहे. पण आम्ही टवाळखोरी करताना त्यांनी आम्हांला खचितच सोडले नसते. जय जय रघुवीर समर्थ!


©विजय माने, ठाणे.

बायको नावाचे अजब रसायन

lesly-juarez-220845-unsplash

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!”
मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. चला, खूपच मनावर घेउुन काय करावे म्हटलं तरी हिलाच आवडत नाही. कारण आपण केलेले कामच त्या दर्जाचे असते. ओल्या कपडयाने साधा टीव्ही पुसला तरी मागे हुसेनच्या पेंटिंगसारखे फरकाटे ठेउुन जातो. एकदा पायात काहीतरी आले म्हणून निरखून पाहिल्यावर कळले की पेन्सिलच्या आत लीडच नाही. पेन्सिलवालेही फसवाफसवी करायला लागले असे म्हणत ती बिनलीडाची पेन्सिल कचर्‍याच्या डब्यात टाकली आणि घरातल्या अजून एका कामाला हातभार लावल्याचे समाधान घेतोय न घेतोय इतक्यात हिने कुठल्यातरी कारणावरून घर डोक्यावर घेतले. दरवाजा धरून ठेवायला जसा आडणा असतो तसे हिचे केस धरून ठेवायला लागणारे जे अवजार होते ते बिनलीडाची पेन्सिल समजून मी डस्टबिनमध्ये फेकले होते.
तेव्हापासून मी घरच्या कामाच्या भानगडीत पडत नाही. घरातली सगळी कामे हिच करते. घरच्या लक्ष्मीला हाउुसवाईफ म्हणणे म्हणजे तमाम गृहिणींचा घोर अपमान आहे. एका अल्लड किंवा बिनधास्त आयुष्य जगणार्‍या मुलीपासून हाउुसवाईफ होणे हे खूप मोठे स्थित्यंतर आहे. अतिशय सुखाचे आयुष्य आणि त्याचबरोबर स्वत:चे जन्मदाते आईबाबा सोडून लग्नाआधी साधी ओळखही नसलेल्या माणसाचा संसार फुलवायला त्या नवीन घरी आलेल्या असतात.
त्या घरी असतात म्हणूनच आपल्याला निवांतपणे आॅफिसमध्ये काम करता येते. नाहीतर आॅफिस सोडले तर आपला तसा काही उपयोगच नसतो. उदाहरणच पाहू, आपल्याच एरियातले लाईटबिल भरायचे आॅफिस नेमके कुठे असते हे आपल्याला माहित नसते. वाण्याला एकवेळ आपले नाव ठाउुक नसेल पण बायकोने फोनवरून सांगितलेले सामान तो गुमानपणे घरी टाकून जातो. इस्त्रीवाला तर दारात आल्यावर समोर उभा राहून स्माईल करणारा माणूस कोण आहे ते कळत नाही पण त्याला बघताच ती कपडयाचा ढीग त्याच्याकडे सोपवते. मोजून कपडे घेणे वगैरे सोपस्कार तोच पार पाडतो. पोरं तर चांगलं सांगूनही आपलं ऐकत नाहीत. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कोण माणूस? अशा नजरेने आपल्याकडे पहातात पण आई ओरडली तरी मुकाटयाने अभ्यासाला बसतात आणि कारटी आगाव झाली आहेत असं आपल्याला उगीचच वाटतं.
बाजारपेठ आणि आपला सबंध तसा पेपरातली बातमी वाचण्यापुरताच येतो. भाज्यांचे प्रत्यक्षातले भाव आपल्याला ठाउुक नसतात. कांदा तीस रुपये किलो म्हणजे महाग की स्वस्त हे तिला स्वच्छ विचारल्याशिवाय कळण्यास मार्ग नाही. मेथीची जुडी वीस रुपयाला झाली आहे ही बातमी ऐकल्यावर आपल्या भुवया उंचावल्या जातात.
“अहो असे काय बघताय? स्वस्त झालीये भाजी. महिन्यापूर्वी हीच जुडी तीस रुपयाला मिळायची.” अजून धक्कादायक माहिती मिळते.
“अगं एकेक रुपयाला माझी आत्या विकायची.”
“त्याला झाली वीस वर्ष.”
संभाषण समाप्त.
आपला नाष्ता, डबा, पोरांना उठवणं, त्याचं आवरणं, त्यांची शाळा यातले आपल्याला काही ठाउुकच नसतं. पण हिला ते अंगवळणी पडलेलं असतं. म्हणून बायकोची किंमत रोज कळत नाही. ती कुठेतरी गेल्यावर जेव्हा आपल्याच घरात एकटयाने रहायचा प्रसंग येतो तेव्हा सगळे समजल्यासारखे होते. सकाळी उठल्यावर दूधवाल्याने दूधच टाकले नाही म्हणून आपण त्याच्यावर चडफडतो. चार मजले उतरून वाण्याच्यातून आपण दूध घेउुन येतो आणि चहा करून पिल्यावर बाजूच्या काकी सकाळी टाकलेली दूधाची पिशवी आणून देतात. मग एक मांजर दूधाला सोकावलेले असल्याचे समजते आणि त्यासाठी आपल्या हिने दूधवाल्याला बाजूच्या काकींच्या कापडी पिशवीत दूध टाकायला सांगितलेले असते हे बॅकग्राउुंड मिळते.
पेपरवाला तिला ताई म्हणून हाक मारून पेपरचे बिल देउुन जातो. मग पैसे आल्यावर बरोबर लक्षात ठेउुन त्याचा व्यव्हार तीच मिटवते. कुणाचे काय, कुणाचे काय हे अक्षरश: आपल्या आवाक्याबाहेरचे असते. आपल्याला दिवसभर आॅफिसच्या एसीत बसून कंटाळा येतो आणि हिने दिवसभर घरात काम करून थकू नये अशी अपेक्षा करतो.
ती माहेरी गेली की घरातली आपल्याला हवी असणारी वस्तू शोधावी. ऐंशी टक्के मिळणार नाही. वाजवीपेक्षा जास्त असॉर्टेड असणारे वीस टक्क्यात बसतात. अहो लोकांना भात लावायचा कुकर सापडत नाही. मग फोन केला की “कशाला हवाय?” म्हणजे घरचा कुकर वापरून हा माणूस आत दगड वगैरे शिजवतो की काय ही त्यांना शंका!
“अगं सांग ना, भात टाकेन म्हणतोय.”
“हे बघा, एकच वाटी तांदूळ घ्या…”
“आधी कुकर कुठे आहे ते सांगितलंस तर घेईन.”
“आहे हो तिथेच.”
तिथेच म्हणजे घरात कुठेही! किचन, बेडरुम आणि हॉल सोडून किचनच्या बंद खिडकीच्या बाहेर ग्रीलमध्ये कुकर ठेवणारी गृहलक्ष्मी सापडल्यास आश्चर्य नसावे. हे लोक चिमण्या आणि कबुतरांना घरटी बनवायला उघडा कुकर ग्रीलमध्ये ठेवतात की काय कळत नाही.
“सापडला का?” वरून ही दमदाटी!
मग हिने फोनवरून सांगायचे आणि होम मिनीस्टरच्या कार्यक्रमातल्याप्रमाणे कसलाही मागमूस नसताना आपण ते शोधायचे ही मोहिम सुरु होते. कुठून अवदसा सुचली आणि भात बनवायला घेतला असे होउुन जाते. तो भात बनविण्यापेक्षा बाहेर जाउुन चायनिज खाल्लेले परवडले असे एक मन सांगत असते.
“आणि थोडंसंच मीठ टाका. नाहीतर टाकाल बचकभर.”
“हो गं.”
कसलातरी आवाज ऐकू गेल्यावर ती विचारते, “मिठाची बरणी नाही ना घेतली?”
“हो बरणीच घेतलीये.”
“वाटलंच मला. वेंधळेपणा नाहीच जाणार. अहो ती मोठया मिठाची बरणी आहे. ते नका टाकू.”
“मग कशाला आणलंय ते मोठं मीठ घरात?”
“जाउु दे हो. तुम्ही पण ना…ती पिवळ्या झाकणाची छोटी डबी मिळते का पहा कुठे.”
“आता त्यात काय आहे?”
“बारीक मीठ.”
“मला मोठं चालेल.”
आता मोठं मीठ (जे खारट असतं) आणि पिठ्ठी साखरेसारखं मॅग्नेशियम, आयोडीन वगैरे असणारं मीठ याच्या चवीत काय फरक आहे हे मला अजूनही उमजलेले नाही.
पण टीव्हीवरच्या सीरीयल पाहून घरोघरी प्रगती झालेली आहे. छोटया छोटया फॅन्सी आकाराच्या अनेक बाटल्या घरी आहेत. पिझ्झा खाताना बुच फिरवून तंबाखू किंवा तपकिरीसारखा तत्सम पदार्थ त्या पिझ्झ्यावर टाकायचा असतो तसाही एक प्रकार आमच्याकडे आहे. कधी फळे खायची म्हटलं की फळांच्या फोडी केल्या की अजून एक कसलातरी मसाला हिने घरी आणून ठेवला आहे तो घेणे सक्तीचे असते. नाहीतर घरी भांडणे होतात. सिंपल!
पण विदाउुट भांडणाचा संसार म्हणजे बिनमीठाच्या पक्वान्नाप्रमाणे असतो. खूप गोड पण ‘ती’ चव नाही. संसार म्हटलं की भांडण आली, भांडयांची आदळआपट आली, मध्ये मध्ये लुडबुडणारी पोरं आली, बायकोचा त्रागा, नवर्‍यावर विजय, माझा, तुझा, पोरांचा वाढदिवस, ते कमी की काय म्हणून लग्नाचाही वाढदिवस, विसरलेली गिफ्ट्स, मग रुसवे फुगवे आणि कसा का असेना गोड शेवट आला. कधी कधी हा लेकाचा शेवट लवकर यावा असे वाटत असते पण दोन्हीही उमेदवारांना आधी दुसर्‍याने माघार घ्यावी असे वाटत असते. काही चतुर उमेदवार तर भांडणाचे चिन्ह दिसताच पांढरे निशाण फडकवतात (हे पुरुषच असतात, ते वेगळे सांगायला पाहिजे का?)
त्यामुळे आम्हा सर्व वेंधळया पुरुषांना सांभाळून घेत संसाराचा गाडा चौखुर उधळत असला तरी व्यवस्थित हाताळून घरोघरी सुखी संसार करणार्‍या रणरागिणींना साष्टांग दंडवत!!


©विजय माने, ठाणे.

माझी इंटरनॅशनल कुंडली

रोज सकाळी आपला टाईम झाला की झाडू मारणारे लोक ज्या निरीच्छ भावनेने झाडू आणि केराची टोपली काढून कामाला लागतात काहीशा तशाच भावनेने मी बॅगेतून लॅपटॉप काढून चार्जिंगला लावला आणि सवयीने पहिल्यांदा मेलबॉक्स उघडला. फुकटात क्रेडिट कार्ड, फोन करायचा अवकाश की लोन, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरच्या असंख्य डिस्काउुंटच्या मेलबरोबर काहीसा नवीन म्हणता येईल असा मेल मला रशियाच्या एलेनाकडून आला होता. तिच्या मते पृथ्वीतलावरच्या अंदाजे सात बिलीयन लोकांपैकी (म्हणजे सातवर भरपूर शुन्ये) मी एकुलता एक नशीबवान माणूस होतो ज्याला हा मेल मिळाला होता. फक्त मेलमधल्या एका लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरायचा अवकाश की खास आपल्यासाठी रशियावरून कुंडली डिझाईन होउुन येणार होती. नाहीतर आपल्या देशी कुंडलीचा कंटाळा आल्याने (अहो या कुंडलीप्रमाणे एक गोष्ट खरी झाली असली तरी शपथ!) मी माझे नाव आणि तत्सम माहिती भरली आणि उत्तर पाठवल्या पाठवल्या लगेच काही तासांतच आपली कुंडली तयार होईल असा संदेश मिळाला आणि सात बिलीयनमधून मी एकटा या नुसत्या विचारानेच मी भयंकर खुश झालो. काही तास सांगितले असले तरी फॉरेनमध्ये कुंडली बनत असल्याने आपल्या इंडियन भटजीसारखा वेळ न घेता अवघ्या काही मिनीटातच एक मेल आला आणि माझ्या केवळ जुजबी माहितीवरून एक छोटी कुंडली काढून देण्यात आली. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे –तुम्हांला कदाचित माहित नसेल पण तुमची राशी अतिशय पॉवरफुल असून त्यामागे एक भले मोठे रहस्य दडलेले आहे. अर्धे आयुष्य गेले तरी या महत्वाच्या रहस्याचा आपल्याला पत्ताच नाही, स्वत:च्या आयुष्याबाबत केवढा हा बेजबाबदारपणा असे मला वाटू लागले. काही अचाट मनोरंजक माहितीमुळे तर माझी उत्कंठा शिगेला पोहोचली आणि मी पटापट वाचू लागलो. खूप काम करूनही हवा तसा मोबदला मिळत नसल्याने आता काहीशा अडचणीतून जात आहेस (हे वाक्य कुणाकुणाला खोटे वाटते त्यानी मला स्वतंत्र मेसेज करावा. पण कशाला करता?जाउु दे.) इथे आपण माझ्या कुंडलीवर कॉन्संट्रेट करू.

१. माझा लकी दिवस : रविवार

रविवार हा माझा लकी दिवस असल्याचे बोल्डमध्ये हाईलाईट करण्यात आले होते. त्यामुळे बिझनेस संबंधित कुठल्या मिटींगा वगैरे प्लान करायच्या असतील तर रविवारी करा असा सल्ला होता. सुट्टीच्या दिवशी मिटींग प्लान करायला काही दिवसांतच करोडपती बनविणार्‍या कुठल्यातरी मल्टीलेवल मार्केटिंगच्या स्कीममध्ये घुसावे की काय असा विचार मनाला चाटून गेला. पण अशा एजंट लोकांना बाकीचे गरीब लोक (हे एजंट लेकाचे बाकीच्या सर्वसामान्य लोकांना काहीच्या काहीच गरीब आणि कमनशिबी समजतात!) खूपच हिडीसफिडीस करतात त्यामुळे तो विचार तात्पुरता बाजूला ठेवला. आमच्याकडे रविवार हा सुट्टीचा वार असल्याने बहुधा सर्वांचाच लकी वार असतो ह्याची त्या बिचार्‍या एलेनाला कल्पना नसावी. असो! बॅक टू कुंडली.

२. माझा लकी नंबर : पाच

हे खरे आहे. कुल्या रांगेत उभा राहिलो आणि आपला नंबर आला रे आला आणि आपण इच्छित ठिकाणी घुसणार या बेहोशीत असताना किंवा कोण पुढे जाउु नये म्हणून उगाचच चुळबुळ करत असताना कुठून कोण जाणे रांग कंट्रोल करायला एक माणूस येतो आणि “उगीच गडबड करु नका. पाच मिनीटे कळ काढा.” असे दरडावत हाताचा पंजा दाखवून चारपाचवेळा तरी थांबा म्हणतो. हा लकी नंबर फक्त आणि फक्त माझ्यासाठी काढण्यात आला होता (कुठून ते एलेनालाच माहित!) या नंबरचा व्यव्हारात जास्तीत जास्त वापर करा असे सांगण्यात आले होते. हॉटेलमधले या नंबरचे टेबल, विमानाची सीट वगैरे (परवडली तर!) या नंबराची निवडा म्हणजे यश तुमचेच. शक्यतो या तारखेला जुगार, मटका, अड्डा जवळ नसल्यास लॉटरी तरी काढाच वगैरे वगैरे (सॉफिस्टीकेटेड भाषेत कसिनो). हा नंबर जितक्यांदा वापरू तेवढे लक जास्त असेल. हे भविष्य लहानपणी हातात पडले असते तर निदान पाचशे पंचावन्न नंबरचा पत्त्याचा कॅट तरी खेळलो असतो. पण त्यावेळी असे एलेनासारखे स्वत:हून मदत करू इच्छिणारे इंटरनॅशनल कुंडलीचे सल्लागार नव्हते.

३. माझा लकी रंग : काळा

कावळयाचा किंवा भविष्यात पसरलेल्या अंधाराचा असणारा हा काळा रंग खूप महत्वाचा असतो. रंग बदलला की आपला मूड बदलतो. फार प्राचीन काळापासून रंगाच्या थेरपीला खूप महत्व आहे. हल्ली वॉट्सअपमध्येही लोक चिडलोय हे दाखवायला लाल रंगाचा चिडका भुवया ताणलेला इमोजी वापरतात. अशा रीतीने रंगाचे महात्म्य आहेच. त्यामुळे तुमच्या लकी काळ्या रंगाचे कपडे घाला किंवा हा रंग काहीही करून जवळ बाळगा.

४. माझे लकी रत्न : हिरा

हे वाचल्यावर मी खूप खुश झालो कारण एका ज्योतिषाने मागे लागून हिरा घालायला लावला होता (देशी ज्योतिषाने सांगितल्यामुळे त्याचा विषेश काही फरक पडला नव्हता. पण आता एलेनाने खास आपल्यासाठी सांगितले आहे म्हटल्यावर काय फरक पडतोय का ते पहाणे क्रमप्राप्तच होते). रत्नांचा आयुष्यावर खूप परिणाम असतो. काही रत्ने तर खूप लक आणतात (आणि काही खडे देशोधडीला लावतात, हे आमचे भटजी. यांनी माझ्या कुंडलीचा अतोनात अभ्यास करून लसण्या नावाचा खडा वापरायला सांगितला होता. त्याची अंगठी घातली आणि त्याच आठवडयात एका पेपरात नापास झालो. क्षणाचाही विलंब न लावता त्या लसण्याला ठाण्याच्या खाडीत फेकून दिला. लाखांत एक अपवाद असणारी अशी एखादी अिद्वतीय कुंडली कुणाला पहायची असेल तर मी शेअर करायला तयार आहे. बर्‍याचदा तर सगळे बरोबर असते पण हव्या त्या गोष्टी घडत का नाहीत या माझ्या अतिसामान्य प्रश्नाचे उत्तर त्या बिचार्‍या भटजींना आजतागायत सांगता आलेले नाही.)

५. आणि या सर्व लकी गोष्टींबरोबर शेवटी लकी माहिना : आॅगस्ट

महत्वाची कामे या महिन्यात करावीत. जगातले बरेचसे प्रख्यात लोक (आता प्रत्येक गोष्टीला पुरावा पाहिजेच का?) याच महिन्यात जन्माला आलेले आहेत. मग या सगळया चांगल्या मुद्दयांचे काँबिनेशन करून काहीतरी अचाट कार्य केल्यावर धो धो पैशांचा पाउुस पडेल असे सांगितलेले. त्यासाठी एलेनाकडून कसलेतरी अजून एक पुस्तक घ्यायला लागेल (जवळजवळ चार हजाराचे!) त्यात तर प्रत्येक दिवसाचे अचूक भविष्य असेल अशी आगाउु माहिती दिली होती.त्या आगाउु पुस्तकाच्या नादी न लागता बर्‍याच दिवसाच्या प्लानिंगने मी आॅगस्ट महिन्यातल्या पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता काळी पॅन्ट आणि हिरा घालून काळ्या कलरच्या गाडीत बसून लॉटरीचे तिकीट काढायला निघालोच होतो. हल्ली हे सगळे मॅचिंगच्या वस्तू वापरायला लागल्यापासून माझ्याकडे कुणीही बघत नाही असे एक निरीक्षण आहे. असे असतानाही मला हवालदाराने गाडी बाजूला घ्या म्हणून का सांगितले ते कळायला मार्ग नव्हता.

“काय साहेब?” गाडीतून न उतरता खिडकीची काच खाली करून मी आतूनच विचारता जाहलो.

“एक हजार रुपये काढा.”

अरेच्चा! ह्यांना एलेनाने काढलेली माझी कंुडली माहित नाही की काय म्हणून आश्चर्याने मी गाडीतून उतरलो अणि विचारले, “का, काय झालं?”

“काही नाही साहेब, स्टायलिश नंबरप्लेट लावली आहे तुम्ही.”

“म्हणून काय झाले?”

“हे बघा साहेब वाचा. तुम्हांलाच कळेल.” असे म्हणून त्यानी रहदारीच्या असंख्य नियमांचे एक गाईड माझ्या हातात दिले. त्यातले नेमके काय बघायचे ते मला कळेना. मग त्याने दोनचार पाने उलटून दाखवल्यावर नेमका दंड किती आहे ते समजला. मुकाटयाने एक आणि दोन शुन्या असलेल्या दहा नोटा मोजून दिल्या आणि पावती घेउुन निमुटपणे निघालो.

इतके दिवस इंटरनॅशनल कुंडलीवर असलेला माझा विश्वास त्यादिवशी अगदी कचर्‍यासारखा उडाला.


©विजय माने, ठाणे.

हनुमानजंप

आडगेवाडीत पूर्वी रामायण पार्टी होती. महत्वाचे म्हणजे सगळयांसाठी लागणारे ड्रेस आणि मेकअपचे सामानही होते. अगदी रामलक्ष्मणाच्या डोक्यावर असणार्‍या जटांपासून ते साधुमहाराजांची भगवी वस्त्रे, कमंडलू, धनुष्यबाण, गदा वगैरे सगळया वस्तू होत्या. साक्षात तालुक्याच्या आमदार साहेबांकडे वशिला लावून त्यांच्याकडून देणगीच्या नावाखाली जी वसुली केली होती त्यातून या सगळया गोष्टी घेतल्या होत्या. तीनचार वर्षे सगळे व्यवस्थित चालले. रामायणाने वाडीचे नाव जिल्ह्यात केले.
रामायणाची सुपारी द्यायला कुठनं कुठनं लोक वाडीला हुडकत यायचे. एकेक पार्टीच तसा होता. रावणाचा पार्ट घेतलेला शामाप्पा एवढा भयंकर होता की त्याने एकदा वस्त्रे अंगावर चढवून हातात खड्ग घेतला की त्याच्या आजुबाजूला फिरकायची कुणाची बिशाद नव्हती. खालच्या आळीतला शे सव्वाशे किलोचा आंदा हनुमानाची भुमिका करत होता. आकारमानानुसार हनुमानाला गदा पुरवण्यात आलेली असल्याने त्याच्याजवळही कोण जवळ जात नव्हते. राम, लक्ष्मण आणि सीता म्हणजे थेट द्वापारयुगातून आल्यासारखी वाटायची. विशेषत: सीता झालेला वरच्या आळीचा पिंटया खूपच सोज्वळ वाटायचा. रामायण संपल्यावर लोक या त्रिकुटाला पाया पडायलाच लाईन लावायचे आणि हे बहाद्दरही लोकांना आशिर्वाद वगैरे द्यायचे. एकंदरीत मंडळींचा चांगला जम बसला होता.
पण काम करणारे पार्टी वर्षानुवर्षे तेच तेच काम करून कंटाळले. त्यांना काहीतरी चेंज हवा होता. एकमेकांचे पार्ट बदलून घेउुया अशी एक कल्पणा पुढे आली पण हनुमान सोडला तर ते शक्य नव्हते. हनुमानाला रावण करता आला असता. पण बाकीच्यांचे काय? मग आहे त्या स्क्रीप्टमध्ये बदल करून नवीन ष्टोरी रचूया असे रावणाचे मत पडले. प्रत्येक रामायणात मरावे लागते अशी त्याची तक्रार होती. लगेच दशरथानेही त्याला पाठिंबा दिला. पण वाडीतल्या शहाण्या माणसांना ती आयडिया पटली नाही.
“मग माजी एंट्री बदलून टाकूया.” हनुमान झालेला आंदा पुढे येत बोलला.
“मंजे?” लोकं आता अजून काय नवीन म्हणून त्याच्याकडं बघायला लागली.
“मला काय वाटतंय, प्रत्येक टायमाला मी जे दार उघडून स्टेजवर जातो, ते एवढं भारी वाटत न्हाय. त्यापेक्षा हवेतनं जंप मारून गेलं तर चांगलीच मज्जा येईल. अशी कायतरी नवी आयडिया काढा.”
“मंजे?”
“काय कंडम माणसं हाय रं तुमी. सगळं फोडून सांगायला लागतंय.” म्हणून त्याने सगळा प्लान सांगितला. आणि तो ऐकल्यावर साक्षात रावणाच्याही अंगावर काटा आला. त्याच्या नवीन प्लाननुसार त्याला देवळावर चढावे लागणार होते. ते एकवेळ ठीक होते पण एंट्री मारतेवेळी कमरेला दोरी बांधून तो स्टेजवर जंप मारणार होता आणि तो पडू नये म्हणून दोघातिघांनी त्याच्या कमरेला बांधलेली ती दोरी सांभाळायची होती. दुसरा कुणीही असता तरी ते जमलेही असते पण शे सव्वाशे किलोचा झटका सांभाळणे कुणालाही अवघडच होते.
“नको बाबा. हाय हेच चांगलं हाय. नीट दार उघडून जात जा आपला.”
“कुठलीबी गोष्ट ऐकून घ्यायच्या आधीच न्हाय म्हणा लेकांनो. काय सांगायला गेलं की हिरमोड करता बगा तुमी.”
“असल्या आयडया काडून हातपाय गळयात घेउुन बसायचं हाय का?”
ह्यांच्यापुढे काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून आंदा गप्प बसला पण ऐनवेळी आपल्याला हवी तशीच एंट्री घ्यायची असे त्याने ठरवले. थोडयाच दिवसांत वाडीची जत्रा आली. जत्रेला रामायण ठरलेलेच असायचे. त्यादिवशी रामायणाची दणकून जाहिरात झाली. आंदानेही आज कुछ तुफानी करते है म्हणत मनाशी काहीतरी ठरवले. रात्री कार्यक्रम सुरु झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने हनुमानाचा पोशाख चढवला, हातात गदा घेतली आणि बाजूला उभा राहिलेल्या बापूला तो म्हणाला, “बापू , दोनतीन माणसांची येवस्था करा.”
“कशाला?”
“चला जरा देवळावर.”
“कशाला?”
“काय न्हाय हो. माझी एंट्री मारायची हाय.”
“जावा बाबांनो तुमीच. नको म्हटलेलं कळत कसं न्हाय रं तुमाला?”
बापूचं काही न ऐकता आंदाने दोघातिघांना बरोबर घेतले आणि ड्रेसिंगरुमच्या मागच्या दरवाजाने तो देवळावर चढायला गेला. देवळावरून वीस फुट खाली असलेल्या स्टेजवर जंप मारायची असा त्याचा प्लान होता. पण ते ऐकल्यावर त्याच्याबरोबरचे तिघे घाबरायला लागले.
“लेकांनो भेताय कशाला? हनुमान कोण हाय. तुमी का मी?”
“व्हय बाबा तूच हैस.”
“मग मला वरनं सोडा. काय न्हाय होणार.”
पण जंप चुकली आणि एखादा हातपाय मोडला तर काय घ्या म्हणून ते ऐकेनात. आंदा मात्र मारली तर खरोखरच्या हनुमानासारखीच स्टेजवर जंप मारणार. नाही तर नाही, म्हणून रुसूनच बसला. इकडे टाईम झाल्यावर राम हनुमानाची वाट बघून कंटाळला. लक्ष्मण ड्रेसिंगरुममध्ये जाउुन तंबाखू खाउुन आला पण हनुमान येण्याचे चिन्ह दिसेना.
शेवटी आंदापुढे सगळयांना माघार घ्यावी लागली. नाईलाजाने त्याच्या कमरेला दोर बांधण्यात आला. मग हाताने खुण केल्यावर हळूच त्याला स्टेजवर कसं सोडायचं हे त्यांने बाकीच्यांना समजावून सांगितले. सगळयांनी माना डोलावल्या. हनुमान जिथून उडी मारणार होता तिथे तो गेला. समोरचं पब्लिक बघून त्याच्या अंगात वारं संचारलं. माणसं बघितली की त्याला तसंच व्हायचं. एरव्ही हनुमानाची एंट्री घेतल्यावरही हा एकदा बाहेर आला की माकडचाळे करत असायचा. डायलॉग बोलायचे सोडून फट्टया तालमीत गेल्यासारखा जोर बैठकाच मारायचा आणि दांडपट्टयासारखी गदा फिरवायचा.
माणसं दिसल्यावर आपल्या कमरेला दोरी बांधली आहे हे तो विसरला. त्याने देवळावरून थेट खालच्या स्टेजवर उड्डाण केले. पब्लिक उडणार्‍या हनुमानाकडे बघतच राहिलं. पण वीस फुटावरून हनुमानजंप घेउुन हनुमान जे खाली बसला ते उठलाच नाही. त्या हिसक्याने दोर पकडणारे देवळावरचे दोघे त्याच्याआधी खाली आले. एकच गोंधळ उडाला. गाववाल्यांना वाटलं हा रामायणातलाच शीन चाललाय. लोकं खुश! काही भाद्दरांनी तर शिट्टया मारून वन्स मोअरची मागणी केली. बर्‍याचवेळानं हनुमानाचे दोन्ही पाय मोडलेत हे समजलं आणि त्याला लागलीच दवाखान्यात हलवण्यात आला.
पुढचे काही महिने हातापायला प्लॅस्टर बांधून हनुमान खाटेवर पडून होता. नंतर वाल्या कोळयाचे अकस्मात निधन झाले, रावण खूपच प्यायला लागला आणि जांबुवंत कायमचाच सासरवाडीला जाउुन राहिल्यावर रामायणात राम राहिला नाही आणि रामायण कायमचं बसलं.


©विजय माने, ठाणे.

बलम पिचकारी

भरधाव धावणार्‍या एसटीला कचकन बे्रक लागला आणि एसटी जाग्यावरच बंद पडली. डुलक्या घेणार्‍यांच्या डोक्याला टेंगळं आली. मधल्या मोकळया जागेत अवघडून उभा राहिलेले प्रवाशी इकडे तिकडे धरायला काही न मिळाल्याने एसटीच्या पुढच्या दरवाजाकडे जमा झाले. ज्यांच्या हातात बाजाराची ओझी होती त्यांनी त्यांच्या बोचक्यांसहित समोर येईल त्याच्यावर आक्रमण केले. काय झालंय हे कळायच्या आत कुणीतरी एसटीचा दरवाजा उघडला आणि केव्हापासून दरवाजात कडमडत असलेला कंडक्टर त्याच्या तिकीटपेटीसह बाहेर सांडला. एका बेसावध म्हातारीची कवळी तोंडातून खाली पडली. ती शोधता शोधता तसल्या दंग्यात म्हातारी किंचाळली, “बाबा ब्रेक मारतूयास का आमचं दात पाडतूयास?”
एका आगाउु पॅसेंजरने मध्येच तोंड घातले, “आज्जीबाई कवळी हाय नव्हं ती?”
“ती बी पाडली की बाबानं.”
“लावा की मग पुन्ना.”
त्याच्या नादाला न लागता म्हातारीने कवळी शोधून पिशवीत ठेवली आणि चष्मा वाचलाय का ते बघू लागली. सगळे ठीकठाक झाल्यावर नेमके काय झाले याची चौकशी सुरू झाली. अचानक गाडीच्या आडवे काय आले ते कुणालाही कळेना. बसमधून पडलेला कंडक्टर कसनुसे तोंड करत आणि कपडे झाडत वर आला. त्याला दरवाजाची कडी कुुणी काढली याची चौकशी करायची होती. एवढयात ड्रायव्हरचा आवाज कानावर आला, “ओ पाव्हणं, काय राव गाडी चालवताय, आला असता की एसटीखाली.”
एसटीपुढे एक मोटारसायकल थांबली होती. मोटारसायकलवरून एक माणूस खाली उतरला आणि त्याने ड्रायव्हरला एसटी बाजूला घ्यायला सांगितली. सांगणारा माणूस किरकोळ असता तर ड्रायव्हरने ऐकले नसते पण माणूस चांगलाच जाडजूड होता. त्याचे ऐकून पळून जाता येणार नव्हते म्हणून ड्रायव्हरने पुन्हा एसटी सुरू केली आणि रस्त्याच्या बाजूला घेउुन उभी केली. नुसती गाडी बाजूला घ्या म्हणून तो थांबला नाही तर त्याने “मी सांगितल्याशिवाय गाडी हलवायची नाही.” असा थेट हुकुमच सोडला.
उगाच काही लफडे नको म्हणून ड्रायव्हरने गुपचूप गाडी बंद केली. तो माणूस एसटीच्या पुढच्या दरवाजातून आत घुसला तसा झालेला प्रकार लोकांच्या लक्षात आला. त्याच्या स्टार्च केलेल्या स्वच्छ पांढर्‍या झब्ब्यावर डाव्या खांद्यापासून कमरेच्या उजव्या भागापर्यंत तलवारीचा वार झाल्यासारखा दिसत होता. एसटीत बसलेला कुठलातरी महाभाग पान खाउुन पचाक्कन बाहेर थुंकला होता आणि त्याचा नकाशा त्याच्या झब्ब्यावर उमटला होता.
लाल पिचकारीत न्हाउुन निघालेला माणूस भयंकर चिडला होता. आधीच गोेरा असणारा त्याचा वर्ण लाल झाला होता. स्वच्छ कपडयांबरोबर त्याच्या गळयात जाडजूड सोन्याची चेन आणि हातात सोन्याचे ब्रेसलेट होते. एकूण राहणीमानावरून तो माणूस आमदार खासदाराच्या कंपूतला वाटत होता. त्या घटकेला त्याच्या तावडीत कोण सापडला असता तर त्याचे काही खरे नव्हते. एसटीत घुसल्या घुसल्या त्याने उजव्या बाजूच्या पहिल्या सीटपासून “कोण हरामखोर आत्ता खिडकीतून बाहेर थुंकला?” अशी चौकशी करायला सुरवात केल्यावर पान आणि तंबाखू खाल्लेले लोक हादरले.
पिचकारी उजव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर आली असे खुद्द फिर्यादीचेच म्हणणे पडल्यावर डाव्या बाजूच्या सीटवर बसलेल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि पुढचा तमाशा बघायला ते तयार झाले. होय म्हणायला कोण तयारच होईना. अशावेळी हरिश्चंद्र होउुन कोण मार खाईल? जो कोण “मी…” म्हणेल त्याचा निकाल पक्का होता त्यामुळे ती रिस्क घ्यायला कुणीही तयार नव्हता. मग त्यानेच प्रत्येकाकडे बोट दाखवून विचारायला सुरवात केली, “तू थंुकलास ना बाहेर?”
“नाही हो पावणं. बसल्यापासून ढकलतोय पण खिडकीच उघडत नाही.”
त्याच्याशी अजून बोलण्यात अर्थ नव्हता हे जाणून झब्बा मागच्या सीटकडे वळला, “तू थुंकलास ना बाहेर?”
“नाही. आपून आजपातूर सुपारीच्या खांडालाही तोंड लावलं नाही.”
त्याच्या तोंडाला लागण्यात अर्थ नव्हता म्हणून तो घायाळ माणूस मागच्या सीटकडे वळला.
“तंबाखू खाउुन बाहेर थुंकलास काय रे तू?”
“नाही हो. हे बघा. अॅऽऽऽ” म्हणून त्याने जीभच बाहेर काढून दाखवली.
त्याने सगळी उजवी बाजू तपासली पण काही उपयोग झाला नाही. सगळयांनी आपापली तोंडे त्याला दाखवली तरीही कोण भेटला नाही म्हणून तो अजूनच चिडला. मग त्याचे लक्ष मोकळया असलेल्या शेवटच्या बाकाकडे गेले. बाकडयावर कोण नव्हते पण वर सामान ठेवतात त्याठिकाणी एक पिशवी होती. त्याने त्या पिशवीला हात घातला आणि विचारले, “ही पिशवी कुणाची आहे?”
अनेकवेळा विचारूनही काहीही उत्तर आले नाही. म्हणून त्याने पिशवी तपासली. आत एक टॉवेल आणि तंबाखूची पुडी दिसली. पिशवीची मालकी सांगायला कुणीही पुढे येत नाही असे दिसल्यावर त्याने आपला मोर्चा कंडक्टरकडे वळवला, “मास्तर कोण बसला होता इथं?”
कंडक्टरने सगळया प्रवाशांवर नजर फिरवली आणि म्हणाला, “एक काळी टोपी घातलेला माणूस होता.”
“कुठं गेला मग?”
“काय माहित? कुणीतरी दरवाजा उघडल्यावर मी पडलो त्या गडबडीत काही कळलंच नाही. बहुतेक त्याला तुम्ही चांगलाच चोप देणार असा डाउुट आला असेल म्हणून पिशवी टाकून पळाला वाटतं!”
त्या अनोळखी काळया टोपीवाल्याला शिव्या देत तो माणूस खाली उतरला आणि गाडीवर बसून निघून गेला. ड्रायव्हरने कंडक्टरला हाक देत बस सुरू केली, “ये निकमा, पाण्याची बाटली घे लेका. पान आण म्हटल्यावर तंबाखू टाकून आणलंस होय? लेका गिळावं लागलं की.”
“मग कुणी सांगितलं हुतं गिळायला?”
“कुणी सांगितलं नव्हतं, पण घावलो असतो तर पावण्यानं दणकून मला पैलवानच केला असता. च्यायला, गाडी चालवत पान खायची काय सोयच राहिली नाही आता.”


©विजय माने, ठाणे.

फेसबुकवरील अॅप्सचा गोंधळ

साधारण दहा ते पंधरा वर्षापूर्वी तुम्हांला इंटरनेट येते का असा एक प्रश्न विचारला जायचा. कुठेही. इंटरव्युव्हला जा किंवा कंप्युटरबद्दल काही फुशारक्या मारत असाल तर हमखास. तसे आता तुम्हांला फेसबुक येते का हे पहाण्याची गरज आहे. झुकेरबाबाने पसरवलेल्या या मायाजालात लहानांपासून म्हातार्‍यापर्यंत सगळेजण पुरते अडकलेले आहेत. त्यातून सुटणे महाकठीण आहे. म्हणून ते जर येत असेल तर बर्‍यापैकी घोटाळे तुम्ही टाळू शकता. आता माझेच उदाहरण पहा.
मोबाईलबर फेसबुकचे नोटीफिकेशन आल्यावर मी ताबडतोब मोबाईलला जागा करून फेसबुकचे खाते उघडले. याबाबतीत मी काटेकोर आहे. असे नोटीफिकेशन पेंडिंग ठेवायला मला अजिबात आवडत नाही. कुणाची फ्रेंड रिक्वेस्ट असू दे किंवा कोणी आपल्या फोटो किंवा पोस्टवर कॉमेंट करू दे मी ताबडतोब ते लाल वर्तुळ नाहीसे करतो (यावरून मला कोणी फेसबुकचा अॅडिक्ट आहे असे बोलाल, पण तसे नाही. खरंच!)
तर नोटीफिकेशन उघडल्या उघडल्या एका मैत्रिणीने मी काहीतरी शेअर केले होते त्याला लाईक दिली होती. मला तर गेल्या बर्‍याच दिवसांत काही शेअर केलेले आठवत नव्हते. मग ही लाईक कशाला आहे म्हणून ते उघडतो तर काय, माझा प्रोफाईल फोटो आणि त्यावर ‘बाईचा नाद’ असे लिहीले होते आणि त्याला दुसर्‍या महानगांनीही बेफाम लाईक ठोकलेल्या! हे सगळे पाहिल्यावर मी हादरलोच, बाईचा नाद! पंधरा वर्षापूर्वी थ्रील काय असते ते अनुभवायला म्हणून एका बाईचा नाद केला होता. असो! सुदैवाने सध्या ती बाई माझ्या लिखाणात तितकासा इंटरेस्ट घेत नाही म्हणून मी असे बिनधास्त लिहू शकतो. त्याबद्दल इथे जास्त लिहीणे उचित नाही.
वास्तविक फेसबुकवर बरीच अॅप असतात. आपल्या कुठल्यातरी मित्रांने त्या अॅपचा पराक्रम पाहिलेला असतो आणि तो त्याच्या वॉलवरही शेअर केलेला असतो. मग काय, क्लिक करायला आयतीच लिंक मिळाल्यावर आपण तिथल्या तिथेच त्याच्याच फोटोवर क्लिक करून आपणही ट्राय मारतो. तसाच मी काल ट्राय मारला होता पण ट्राय मारून झाल्यावर जो काही पराक्रमाचा निकाल समोर आला होता तो फेसबुकवर शेअर करू का असे फेसबुकने विचारायला हवे होते. कदाचित विचारलेही असेल पण आपला निकाल काय आहे या उत्कंठेपोटी त्याकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे माझा पराक्र्रम माझ्या वॉलवर शेअर होउुन मला लाईक मिळाल्या होत्या. ‘तुमच्यातला सर्वात वाईट गुण कोणता आहे?’ असा तो प्र्रश्न होता.
आता विषय निघालाच आहे तर आपण अजून काही उदाहरणे पाहू. एका अॅपमध्ये ‘कोणता हिंदी पिक्चरवाला डायलॉग तुम्हांला चपखल बसेल?’ म्हणून प्रोफाईल फोटो निवडायचा असतो. आपण लगेच आपला मस्तपैकी गॉगल वगैरे लावलेला प्रोफाईल फोटो शोधून काढतो. मग ते अॅप देव जाणे काय करते आणि आपल्यासाठी डायलॉग शोधून काढते ‘डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है’. वास्तविक हा जो कोणी डॉन असतो त्याला सकाळी साठेआठला ठाण्याच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरची ठाण्यावरून सुटणारी लोकलही धडपणे पकडता येणार नाही. रस्ता क्रॉस करताना समोरून सायकलवरून एखादं कारटं जरी आडवं आलं तर डॉन त्याची धडक बसू नये म्हणून लाल सिग्नल लागल्यासारखा थांबतो. आणि हा डॉन पोलिसांना गुंगारा देणार! तात्पर्य काय? हे फार सिरीयस घेउु नये आणि हे सगळं करत असताना फेसबुकवर शेअर तर झाले नाही ना, हे डबल चेक करावे.
माझ्या एका अमराठी मित्राने ‘तुम्हांला लोक काय समजतात?’ या गंमतीला आजमावले होते. बर्‍याच लोकांना ‘चिकना हिरो’, ‘चांगला गडी’ वगैरे येते पण त्याला ‘एक्स त्या’ असे उत्तर आले होते आणि तो “मराठीत ‘एक्स त्या’ म्हणजे काय?” हे चेहर्‍यावर कमालीचा मासूमपणा आणून भर मिटींगमध्ये विचारत होता. मी त्याला ‘तात्या’ असे सांगून वेळ मारून नेली होती. (‘एक्स त्या’ ही एक शिवी आहे. विषेश करून मुंबईत हिचा जास्त प्रमाणात वापर होतो. कॉलेजमधल्या मंडळीनी तर या शब्दाला एवढे बोथट केले आहे की एखादे टोपणनाव असल्याप्रमाणे ते मित्राला या शिवीने हाक मारतात.)
तात्पर्य : विमानात सुचना देतात त्याप्रमाणे केबिन प्रेशर कमी झाल्यास दुसर्‍याला मास्क लावण्याआधी तो स्वत: लावा (आणि मग बाकीच्या हव्या त्या गावक्या करा) तसे फेसबुकवर कोणतीही अॅप्स ट्राय करण्याआधी स्वत: निकाल तपासा आणि समाधानकारक असेल तरच दुनियेला दाखवा नाहीतर फेसबुक तुम्हांला ‘तात्या’ बनवल्याशिवाय रहाणार नाही.


©विजय माने, ठाणे.

नवरदेवाची फजिती

मंग्या उर्फ मंगेश पाटील याच्या लग्नाचा उमेदवारीचा काळ कधीच लोटून गेला होता पण लग्न काही जमत नव्हते. मुलीकडचे लोक पहायला येउुन बंगला वगैरे बघून खुश होउुन जायचे पण नंतर मध्येच काहीतरी निघायचे आणि जमत आलेले फिसकटायचे. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे मंग्याची कुंडली आणि दुसरी त्याला मिळत नसलेली नोकरी. मंगळ, राहू, केतू वगैरे मंडळींनी मंग्याच्या कुंडलीत नुसता धुमाकुळ घालून ठेवला होता. बर्‍याच मंडळीना नवराही पसंत असायचा पण कुंडली पाहिली की लोक चक्क नकार द्यायचे. या उभ्या आडव्या रेषांच्या कुंडलीत माझ्याबद्दल असे काय लिहीले आहे, याचे मंग्याला नेहमी आश्चर्य वाटायचे.
वास्तविक नोकरी करायची मंग्याला गरज नव्हती. गावात बंगला होता, जमीनजुमला बक्कळ होता पण नोकरीशिवाय छोकरी देत नाहीत हे सत्य होते. शेवटी बर्‍याच खटाटोपाने कशीतरी का होईना, पुण्यात एक खाजगी नोकरी मिळवण्यात मंग्याला यश आले आणि ती हातातून जायच्या आत पोराचे लग्न करून टाका, अशी पाटलांकडे एका भटजीने पुडी सोडली.
मंग्याच्या लग्नकाळजीने त्यांना बरीच वर्षे जेरीस आणले होते. आता योग जुळून आलाय म्हटल्यावर त्यांनी खबरे सोडून सर्व पाहुण्यांना संदेशच धाडले. त्यातले बरेचजण आधी येउुन गेले असल्याने पुन्हा येण्याच्या भानगडीत पडले नाहीत. चार दिवसाची वाट पाहून झाल्यावर एक पाहूणा आला आणि त्यांना पाहून पाटील आनंदले. चहापाणी घेता घेता नवरदेवाच्या नोकरीची चौकशी झाली. सुदैवाने ती नुकतीच मिळाली होती. दुधात साखर म्हणजे पाहुण्यांचा कुंडलीवर अजिबात विश्वास नव्हता.
एवढी वर्षे हे पाहुणे कुठे होते याचे सर्वांना कोडे पडले. याआधी अशा देवमाणसांना का बोलवले नाही याचा खुद्द पाटलांबरोबर सर्वांनाच पश्चाताप झाला. मंगेशरावांना लग्न आटपून लगेच नोकरीवर हजर रहायचे आहे हे ऐकल्यावर मुलीकडच्यानीही लागलीच लग्न करून टाकूया या प्रस्तावाला लगेच मान्यता दिली व जास्त उशिर न करता लवकरात लवकर लग्नाचा मुहुर्त काढण्याचे ठरले.
व्यव्हारात पारदर्शकता असावी या हेतूने “तुम्हीही मुलगी पहायला या.” म्हणून पाहुणे जाता जाता सांगून गेले पण मंग्याने त्याच्या कुंडलीचा एवढा धसका घेतला होता की पोरीला न बघताच “काही गरज नाही. मुहुर्ताचे तेवढे लवकर सांगा.” म्हणून होकारावर शिक्कामोर्तब केले. मुलगी पहाण्यासाठी पुन्हा सगळी व्यवस्था, पोहयांचा कार्यक्रम आणि अजून त्यात काही संकटे टपकायला नकोत म्हणून त्याने फेसबुकवरचे फोटो बघून मुलगी पहाण्याचे समाधान पदरात पाडून घेतले.
नवीन नोकरी असतानाही लग्नासाठी मंग्याने पंधरा दिवस सुट्टी काढली. लग्नाच्या याद्या तयार होउुन खरेदीला सुरवात झाली. पाटलांच्या घरचे लग्न म्हटल्यावर ते धुमधडाक्यात होणार यात शंकाच नव्हती. गावातला ट्रॅक्टरवरचा डीजे आणि नवरदेवाला घेउुन नाचणारा पवारांचा घोडा हे लागलीच बुक झाले. एरव्ही पुण्यात असणारा मंग्या पवारांच्या घोडयाची थोडीफार कीर्ती ऐकून होता. पण कशाला त्याचा आणि आपला संबंध येतोय म्हणून त्याला विसर पडला होता.
पण लग्नादिवशी सकाळसकाळी घोडा दरवाजात आल्यावर मंग्या हादरलाच. घोडा एवढा तगडा आणि उंच होता की त्यावर शिडी लावूनच चढावे लागले असते. तो हो नाही करत होता पण लोकांनी त्याचे ऐकलेच नाही. सुट, बुट आणि डोक्यावरच्या फेटयासह त्यांनी मंग्याला घोडयावर ढकलला. वाजंत्री वाटच बघत होते. जसा मंगेशराव घोडयावर बसला तसे ते सुरूच झाले. अंगात आल्यासारखे ते आपापली वाद्ये बडवू लागले आणि त्या सरावलेल्या आवाजाने पवारांचा ‘म्युझिकल घोडा’ नाचू लागला.
अर्धा तास हा कार्यक्रम चालू होता. घोडयाच्या नाचाने वरखाली होउुन एव्हाना मंग्याच्या पोटात दुखायला लागले होते. वर्‍हाड येण्याची वेळ झाली होती आणि ते आल्यावर त्यांच्यावर इंप्रेशन मारायला वाजंत्र्याबरोबर लोकांनी डीजेही तयार ठेवला होता. तो व्यवस्थित चालतोय की नाही हे पहायला त्यांनी डीजे चालू केला तसा आवाजाचा धमाका झाला.
त्या झटक्यात मंग्या हवेत उडून नशीबाने घोडयावरच पडला. पडता पडता घोडयाखाली जाउु या भीतीने त्याने जीवाच्या आकांताने लगाम ओढला आणि हिसक्यासरशी घोडा चौखूर उधळला. घोडयाचा मालक एका लाथेत हातातल्या काठीसह गायब झाला. हा हा म्हणता घोडा सगळयांसमोरून मंग्याला घेउुन पसार झाला. त्याच्या मागे लोकांनी गाडया सोडल्या. त्यांच्या भीतीने की काय, घोडा अजूनच गांगरला आणि अंगात वारे शिरल्यासारखा तो गावाबाहेर धावत सुटला.
नवरदेवासह घोडा पळाल्यावर मंडपाची कळाच बदलली. लोकांना हसावे की रडावे ते कळेना. घोडा ज्या आवेशात मंग्याला घेउुन पळाला होता यावरून तो परत येईल याची कुणाला शाश्वती वाटत नव्हती. बायका “आता काय?” म्हणून तोंडाला हात लावून बसल्या. तेवढयात एक कारटं “घोडा स्टॅन्डवर जाउुन यष्टीला धडकला आणि नवरदेव यष्टीखाली गेला.” ही बातमी घेउुन आलं. लोक कावरेबावरे झाले. चर्चेला एकदम उत आला आणि पुन्हा मंग्याची कंुडली चव्हाटयावर आली.
घोडयावरचा मंग्या मात्र अवघडला होता. पोटात दुखत होते त्याचे काही वाटत नव्हते पण घोडयाला कसा थांबयावचा हा प्रश्न होता. कुठल्या मुहुर्तावर लोकांना या घोडयाची अवदसा सुचली असे त्याला वाटू लागले. गाडीच्या लाईट, ब्रेकला वगैरे करतात तसे घोडयाला पोटावर, मानेवर दाबून झाले पण तो लेकाचा थांबायला तयार नव्हता. लग्नाचा विचार बाजुलाच राहिला आणि जीव मुठीत धरून बसलेल्या मंग्याला आयुष्याचा शेवट दिसू लागला. आपण बिनघोडयाचे साधे लग्न केले असते तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले. तशा परिस्थितीतही इतिहासकालीन मावळेलोक कसे घुडसवारी करत असतील असाही मजेशीर प्रश्न त्याच्या मेंदूला चाटून गेला.
तेवढयात त्याला समोरून येणारे वर्‍हाड दिसले आणि नवरदेवाचा तोरा सोडून मंग्या ओरडला, “ओ पाव्हणं, घोडा अडवा घोडा.” मंग्याला अजून बरेच काही बोलायचे होते पण तोंडातून आवाजच निघत नव्हता.
पाहूण्यांना मजा वाटली. आपल्या स्वागताला वेशीपर्यंत घोडयावरून साक्षात जावईबापूच आले म्हणून ते भलतेच खुश झाले. लगेच ते घोडयाच्या आडवे गेले. अचानक सगळेच लोक आडवे आल्यामुळे घोडयाला एकदाचा ब्रेक लागला आणि ती संधी साधून मंग्याने सुटाबुटाची पर्वा न करता थेट खाली उडी मारली.
वर्‍हाड आले पण नवरदेव गायब होता. आता काय करायचे म्हणून सगळे चिंतेत होते. तेवढयात नवरीच्या गाडीतून अंगाचा थरकाप झालेले मंगेशराव ऐटीत उतरले आणि त्याला सुखरुप पाहून मंडपात जल्लोष झाला. लोकांनी पुन्हा डीजे चालू केला. लग्न बाजुलाच राहिले आणि लोक डीजेवर नाचू लागले. वर्‍हाडालाही काय भानगड आहे ते कळेना. तेही डीजेत सामील झाले आणि तेवढयात कोणतरी ओरडले, “ये, जा रे त्या पवाराच्यात. वरातीला घोडा तेवढा घेउुन या…”


©विजय माने, ठाणे.

तो # ४

बर्‍याच दिवसानंतर मला या माणसाची दुसरी बाजू समजली. मला रोज गाठणारा हा माणूस माझ्याकडून दोन महिन्याच्या रेशनला पुरतील एवढे पैसे घेउुन जो गायब झाला ते चार महिने तो दिसलाच नाही. फोन केला तर उचलायचाच नाही. आणि उचलला तर “एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये आहे. भेटल्यावरच सांगतो.” असे सांगायचा. या लोकांचे कसले महत्वाचे प्रोजेक्ट असतात काही कळत नाही. त्याच्यापासून पिच्छा सोडवून घ्यायचा असेल तर त्याला आपणहून उसने पैसे देण्याचा शोध मला फार उशिरा लागला.
सुरवा­सुरवातीला मी खूष होतो पण हा माणूस भेटण्याची काहीच चिन्हे दिसेनात तेव्हा आपले पैसे घेउुन हा परदेशात वगैरे पळून जातोय का काय, याची मला काळजी वाटू लागली. मी स्टेशनवर आलो की त्या हॉटेलमध्ये डोकावून जायचो पण हा तिथे नसायचा. एक दिवशी असाच हताश होउुन स्टेशनवर परतत होतो एवढयात हा फलाटावर दिसला. खिन्न झालेले मन एका क्षणात टवटवीत झाले. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने पन्नास रुपयाच्या नोटेखेरीज खिशात फक्त रेल्वेचा पास होता. अशा आणीबाणीच्या काळात या गुरुमित्राचे दर्शन झाल्यावर मला हलकं हलकं वाटलं. तो मात्र मला पाहिल्यावर पळायच्या बेतात होता. माझ्याकडे पाहिल्याबरोबर त्याने एका धावत्या लोकलच्या दरवाजाकडे धावही घेतली होती पण मी चित्त्याच्या चपळाईने त्याला पकडला.
मनातला चार महिन्याचा संताप केवळ क्षीण हास्य मुखावर आणून गिळला.
“अरे काय बाबा, इतके दिवस होतास कुठे?”
“अरे एका प्रोजेक्टमध्ये अडकलो होतो.” हे त्याचं नेहमीचंच उत्तर आहे. सगळयांना हेच उत्तर सांगण्याचा त्याचा अनोखा प्रोजेक्ट आहे.
“अरे कल्याणमध्ये दोन शिक्षकांवर अन्याय झाला. त्याला वाचा फोडायची होती. त्याचाच सर्व्हे चालू होता.”
“कोण वाचा फोडतंय याचा?”
“नाही रे. ही बघ आज ही बातमी छापून आली आहे.” असे म्हणून तयाने ती बॅग शोधायला सुरवात केली.
या मनुष्याने माझे पैसे घेउुन चार महिने भूमिगत होउुन माझ्यावर जो अन्याय केला होता, ते त्याला सांगायलादेखील माझी वाचा फुटत नव्हती.
“चल चहा घेउु या.” तोच म्हणाला. मी त्याच्याकडून काहीतरी पैसे परत मिळतील म्हणून निमूटपणे त्याच्या मागून गेलो.
आपल्या बातम्या आणि कविता ऐकायलाच ईश्वराने मला बनवले आहे अशी त्याची ठाम समजूत आहे. मग त्याच्या काही नव्या बातम्या आणि जुन्या कविता ऐकल्या. हा प्राणी मला सगळया जगाची उलाढाल सांगत होता. कुठल्या नाटककाराला भेटलो, अमके नाटक पाहिले, तमका पिक्चर बघितला ही माहिती काहीही ऐकायला तयार नसलेल्या कानांवर पडत होती. हवा असलेला परत द्यायच्या पैशाचा विषय हा इसम काढत नव्हता. नंतर नंतर हा आपले काही देणे लागतो हे विसरला की काय, असा एक जीवघेणा विचारही माझ्या डोक्यात येउुन गेला.
“पैशाची थोडीफार मदत होईल काय?” खरंच पैशाची ज्यावेळी निकड असते त्यावेळी ही साली कळकळ की काय आपोआपच तोंडावर येते.
“सोमवारी नक्की काम होईल.” त्याने आश्वासन दिले.
कुठल्या सोमवारी याचा पत्ता नाही. लाज, लज्जा, शरम नावाच्या वस्तूंचे गाठोडे घरातल्या खुंटीवर अडकवूनच हा माणूस घराबाहेर पडतो. मला माहित आहे, त्याचा हा सोमवार कधीही उजाडणार नाही. भरपूर सोमवार येतील आणि असेच कोरडे जातील. मी त्याला भेटल्यावर माझ्या पैशाऐवजी तो मला चहा देईल. पण त्यावेळी तो त्याच्या बातम्या आणि कविता ऐकवायला विसरणार नाही. हयाला पैसे देण्याआधी मी माझ्या एका परममित्राचा सल्ला घेतला होता. त्यानेही “दिलेले पैसे बुडीत आहेत समजून द्यायचे तितके दे.” असे सांगितले होते. चूक माझीच होती. कधीकधी आपल्या हातून अशा चूका होताना समजतात पण स्वभावाला औषध नसते.
बरेच महिने उलटून गेले. मध्यंतरी मित्राकडून तो एका पेपरचा उपसंपादक झाला आहे हे समजले. पगार वगैरे चांगला होता म्हणजे बिनधास्त भेटायला हरकत नव्हती. पण भेटीचा योग काही येत नव्हता. एकदिवशी उडप्याच्या हॉटेल समोरुन चाललो होतो आणि अचानक कानावर हाक आली. वळून पाहिले तर उपसंपादकसाहेब मला बोलवत होते. बसल्या बसल्या माझ्यासाठी कॉफी मागवण्यात आली. त्यादिवशी त्याची शबनम बॅग विसरली होती. त्या खुशीत मी बिलाचे पैसे काढले. मला अडवत बिलही चक्क त्याने दिले.
“बाकी कसं चाललंय?” पाहुणचाराने कृतकृत्य होत मी विचारले.
“आपल्या आशिर्वादाने एकदम झकास!” म्हणत त्याने मलाच क्रेडिट दिले.
“मस्त जॉब आहे. चांगली सॅलरी आहे. पहिल्या सॅलरीतच सगळयांची देणी फेडून टाकली.”
या नवीनच माहितीने मी चाट पडलो.
“तुझं कसं काय?”
“अॅज युजूअल. खूप आउुटडोअर्स आहेत. परवाच चेन्नईवरून आलो. आठवडाभर पकलो च्यायला!”
“अच्छा.” त्याला विषेश काही देणंघेणं नव्हतं पण मी आपला खरं खरं सांगत होतो.
“बरं, काय कथा बिथा असतील तर तयार ठेव. आपल्या दिवाळी अंकात छापून टाकू.” म्हणून त्याने बाजूला बसलेल्या इसमाला “आपला मित्र आहे, जाम भारी लिहीतो.” असं सांगितलं आणि “चल यार, एकदिवशी तू, मी, दिग्या बसून मजा करूया.” म्हणत निरोप घेतला. त्याला नक्की घाई असावी, नाहीतर एवढया गडबडीत तो गेलाच नसता

©विजय माने, ठाणे.

तो # ३

नाटकाची आवड हा त्याच्या आणि माझ्या मैत्रीतला दुवा आहे. पण मला आवडलेले नाटक त्याला आवडेलच असे नाही. एखाद्या संवादाला खळाळून हसलो की “छे! या नाटकात काही डेप्थ नाही.” असे तो म्हणतो. ही डेप्थ काय भानगड आहे मला अद्यापही कळत नाही. त्याला आवडलेले नाटक मला आवडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याने जबरदस्तीने बघायला नेलेल्या नाटकात रंगमंचावर ज्या काही अगम्य गोष्टी चाललेल्या असतात त्यापेक्षा आजुबाजूच्या गोष्टी रम्य वाटायला लागतात. तरीही तो नाटक बघण्यात तल्लीन झालेला असतो.
एकदा अमुक अमुक नाटक कंपनीत माझा मित्र आहे आणि आपल्याला फुकट पास मिळणार आहेत म्हणून त्याने आम्हांला नाटकाला नेले. मित्र भेटला. त्याने अगदी जिकीरीने पास आणून दिले. मी पैसे काढत होतो पण हा मलाही पैसे देउु देईना. त्या बिचार्‍याची पंचाईत झाली. नाटक जणू काय आपल्या मित्रावरच आहे असे त्याने बॅकग्राउुंड तयार केले होते. पण नाटकात त्या मित्राचे काम अवघ्या पाच­सात मिनिटांचे होते. सुरवातीलाच तो गणपती होउुन थरथरत आला आणि मध्यंतरांनंतर शिवरायांच्या एका पोवाडयात अनेक मावळ्यांपैकी एक मावळा होउुन भगवा फडकवत नाचत गेला.
नाटक आणि पेपरात त्याच्या ओळखीचे बरेच लोक आहेत. “केवळ गप्पा मारण्यासाठी ते मला इकडे भेटायला येतात.” असे तो मला सांगतो.
तिथे बसून चहा घेताना असाच एकजण आला. हस्तांदोलन वगैरे झाले.
“हे रघु काशीकर. पुण्याचा भामटा या नाटकात काम करतात.” अशी ओळख करून देण्यात आली.
“नमस्कार.”
त्या भामटयाने साधा नमस्कारही केला नाही. मी आपला सगळ्यांना “नमस्कार, थँक्यू.” वगैरे म्हणत असतो. एकदा तर चुकून विमा एजंटाला विम्याचा हप्ता देउुन “थँक्यू.” म्हणालो, तर त्याने माझे दोनशेवीस रूपयेच परत दिले नाहीत. सुटे नाहीत म्हणाला ते आजतागायत देतोच आहे.
“पुण्याच्या भामटयात काय रमाकांतचा रोल केलाय का?” मी काय ते नाटक पाहिलं नव्हतं. पण हयाच्याकडून ऐकून होतो.
“रमाकांतचा नाही. त्याचा रोल खूपच छोटा आहे.”
“मग?”
“कंपौडरचा.”
“कमाल आहे तुमची. पूर्ण नाटकात कंपौडरची कपडे घालून फिरायचं म्हणजे ­” मी संभाषण चालू ठेवावे म्हणून काहीतरी बोललो.
“त्याची आता सवय झली आहे.”
“भूमिका मोठी आहे का?”
“हो. हिरोला अपघात होउुन त्याचे डोळे जातात. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. सगळ्या मेडिकल टेस्टमधून त्याच्या ब्रेनचे स्कॅनिंग केलं जातं. त्याच्या आॅप्टिकल स्क्रीनवर आॅब्जेक्टची इमेज तयार होत नाही हे कन्क्लूजन काढले जाते.”
“बापरे, एवढं सगळं दाखवलंय त्यात?”
“नाही हो. हे सगळं सुत्रधार सांगतो. त्यानंतर उपचार करून त्याचे डोळे येतात आणि डोळे उघडताना त्याच्या पट्टया सोडायला जो कंपौडर येतो, तो मी असतो.”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला.
हा माणूस कारण नसताना मला उगीचच चित्रविचित्र माणसांच्या ओळखी करून द्यायचा. एकदा मी, दिग्या आणि हा चहा पित असताना एक केवळ होपलेस वाटेल असा एक माणूस आला.
“हे यक्षण कश्यप.”
दिग्या म्हणाला, “आता हा आणि कोण?”
“अरे हळू बोल.” मी.
दिग्याला पुढचा माणूस कितीही मोठा असला तरी काहीही फरक पडत नाही. बिनधास्त तोंडात आले की बोलून टाकतो. तो कुठलाही कश्यप असता तरी मला काहीही फरक पडला नसता. पण उगीच आपलं त्याला वाईट वाटायला नको म्हणून मी समोरून नमस्कार केला.
“माहित आहेत का तुला कोण ते?” आली पंचाईत?
“नाही.”
“तू ते झाडाच्या फांदीआडून गाणं ऐकलंस?”
“नाही.”
“छान! त्याचेच ते कवी.”
मी कविराजांना दोन्ही हात जोडून दुसर्‍यांदा नमस्कार ठोकला. पण खूप आदर द्यावा असा तो वाटला नाही. तो येउुन बसल्यावर कविता सोडून एका नवीन नाटकावरच चर्चा सुरू झाली. हा माणूस कुठल्याही नवोदिताचा उल्लेख ‘अरे तुरे’च करतो.
“परवा संतोषचे नाटक बघितले. पण समाजकारणाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला तर दारिद्रय हा त्या नाटकाचा गाभा आहे, असं मला वाटतं. हल्ली संतोष चांगला लिहायला लागला आहे.” संतोष म्हणजे संतोष पवार. जणू संतोष शाळेत हयाच्याच बाकावर बसत होता!
आजवर मी शेकडो नाटके बघितली आहेत. पण का कुणास ठाउुक, डे्रसिंगरुममध्ये जाण्याचं धाडस माझ्याने झालं नाही. हे त्याला समजल्यावर दु:शासनाने द्रौपदीलाही जेवढया निर्दयपणे खेचले नसेल असे त्याने मला त्या डे्रसिंगरुममध्ये नेले. तिथले नट कपडे बदलत होते. नटया रंगाचे तोंड साफ करून नवे रंग चढवण्यात मग्न होत्या. हयाने जाउुन त्या लेखकालाच धरला आणि “रिलेशन्सचे कॉम्प्लीिकेशन्स का वाढवले आहेत?” याची चर्चा सुरू केली. मध्यंतर संपून नाटक सुरू व्हायची वेळ आली तरी यांची चर्चा संपेना. तो लेखक बिचारा ‘कुठून बुध्दी झाली आणि हे नाटक लिहिले’ म्हणून स्वत:वरच कावला. माझी चुळबुळ सुरू झाली. त्याला तिथून मुश्किलीने काढला आणि बाल्कनीवरच्या खुर्चीत कोंबला.
ते नाटक संपल्यावर त्याने माझे डोके खायला सुरवात केली. या बाबतीत दिग्याचं एक बरं आहे. दिग्या त्याला “हे नाटक भिकार आहे.” असं तोंडावर सांगून टाकतो. कधी कधी दिग्याच्या बिनधास्तपणाचे मला कौतुक वाटते. मी एकदा दिग्याला विचारले, “हा तुला काही बोलत नाही का असं डायरेक्ट काही बोलल्यावर?”
“त्याला माहित आहे आपलं मत ठाम म्हणजे ठाम. अजिबात बदलणार नाही. त्यामुळे तो आपल्या नादी लागत नाही.” दिग्या उवाच. अगदी प्रामाणिकपणे!
पण हेच ठाम मत मी दिल्यावर त्या नाटकातली मला न दिसलेली कौशल्ये त्याच्या तोंडून ऐकावी लागतात. एकदा तर त्याने कहरच केला. “नाटक हे कथेसाठी बघायचेच नसते. ते डायरेक्टर आणि त्यातल्या मांडणीसाठी बघायचे असते.” असे काहीतरी मला समजावत होता. हा माणूस मग प्रॉपर्टी, सोफासेट, खुर्च्या, टेबले अशा वस्तूंची दहा टक्क्यांपासून पन्नास टक्क्यांपर्यत सूट असणारी प्रदर्शने बघायला का जात नाही, ते कळत नाही.

क्रमश:


©विजय माने, ठाणे.

तो # २

नाडीची विजार, बिनकॉलरचा नेहरु शर्ट आणि गळयात शबनम बॅग असा इसम विक्रोळी स्टेशन परिसरात कुठे दिसला तर ओळख काढण्याच्या भानगडीत न पडता डायरेक चर्चा सुरु करा. आपोआप ओळख होईल. आमच्या एवढया बॅगा, छत्र्या, मोबाईल चोरीला जातात पण हयाची बॅग चोरीला का जात नाही, काही कळत नाही. ही बॅग ज्यादिवशी चोरीला गेल्याचे समजेल त्यादिवशी मी तर पेढे वाटेन. त्याच्या बॅगेत नुसत्या कविताच नसतात तर कुठल्यातरी लग्नपत्रिकेची एक कच्ची आणि एक पक्की प्रत असते. त्या कागदपत्रातून चुकून त्याला हात लागतो आणि तो अत्यंत उत्साहाने म्हणतो, “ही लग्नपत्रिका मी सेट केली आहे. वाच.”
आज्ञा झाल्यावर आपल्या इच्छा मनात दाबून वाचायचे. त्यातले एक अक्षर लागत नाही. एका नवर्‍याच्या आयुष्याचा खेळ होताना मजा बघायला या, असा तो मजकुर असतो. पण तोही कुणाला नीट कळू नये याची दक्षता या कविमित्राने घेतलेली असते.
बहुतेकदा माझा चहा संपत आला की हा बॅग शोधायला लागतो. हा माणूस फक्त कवीच नाही. एकवेळ तेही परवडलं असतं. पण कुठल्यातरी पेपराचा वार्ताहरही आहे. वार्ताहर आहे असं तो सांगतो. बातम्या काय देतो ते देवच जाणे! दिवसातले चोवीस तास त्या उडप्याच्या हॉटेलात नाहीतर बाजुच्या बारमध्येच बसलेला असतो.
मला बारमध्ये बसायला अजिबात आवडत नाही. एकतर विदयुत महामंडळाने लोडशेडिंग केल्यासारखा नेहमी तिथे अंधार असतो. आणि दुसरे म्हणजे आतल्या तसल्या अंधारातल्या गर्दीत कोणतरी ओळखीचा निघण्याची शक्यता असते. न पिताच सगळीकडे बोंबाबोंब होण्याची भीती असते. ज्याला कर नाही त्याला असा डर असतो. पण हयाच्यामुळे मी अनेकदा बारमध्ये जाउुन बसलो आहे. हा स्वत:साठी व्हिस्की आणि माझ्यासाठी कीटकनाशक कोला मागवतो. व्हिस्की घेतल्यावर हा ती घटाघटा पिणार नाही. त्याला एका बाटलीत दोन बाटल्या सोडा मिसळावा लागतो. आणि मग हा एक एक घोट राजासारखा पिणार! त्या मानाने आमच्या खोलीतले शरदमामा बरे. प्यायची त्यांना अजिबात सवय नाही. फक्त दुसर्‍याने दिल्यावर घेतात. कितीही! जे लोक एका पेगने आडव्या होतात त्या ब्रांडच्या बाटल्याच्या बाटल्या घेउुनही न डगमगता डबे आणायला ते खाणावळीत जातात आणि “दोन भाकरी जास्ती दया.” म्हणून न विसरता सांगतात.
तो स्वत:ला सर्वज्ञानी समजतो. त्यामुळे त्याच्यासमोर तोंड उघडले तरी आणि नाही उघडले तरी पंचाईत होते. लग्न होउुन तीन वर्षे उलटून गेली होती. बायकोला गावावरून आणायचे होते म्हणून एखादी खोली मिळवण्याच्या खटपटीत होतो. ते चुकून हयाच्याजवळ बोललो. हयाने मुंबईतल्या हजार एरियाची नावे सांगितली. “इकडे घेतलीस तर हे चांगलं आहे. तिकडे घेतलीस तर ते चांगलं आहे.”
मी चतुराईने विषय बदलून गाडी वाचनाकडे वळवली. त्याने मला “खूप चांगले आहे.” म्हणून स्वामी विवेकानंदांचे एक पुस्तक दिले होते. ते आख्खे पुस्तकच्या पुस्तक वाचून झाल्यावर मला त्यातले काहीही कळले नाही, हे त्याला प्रांजळपणे सांगून टाकले तर हयाचं वेगळंच.
“नाहीच समजणार तुला. वैचारीक पुस्तके कळायला एक वेगळाच मेंदू लागतो.”
माझ्याकडे तसला मेंदू नाही हे माहित असूनही या मस्तिष्कधारी पंडिताने मला ते पुस्तक का दिले होते ते समजायला मार्ग नव्हता.
“स्वामी विवेकानंद मला समजतील. अगदी आरपार. पण मला ते पचणार नाहीत. तुझ्याआधी मीही ते पुस्तक वाचलं पण पचलं नाही.” हा माणूस स्वामी विवेकानंदांचे पुस्तक खायच्या वार्ता करतोय काय ते मला समजेना.
“काय आहे, जर्न्यालिष्टला हे सगळं वाचावंच लागतं.”
“हो का?” नाहीतर जर्न्यालिष्टला हे करावं लागतं, जर्न्यालिष्टला ते करावं लागतं, याची सगळी लिष्टच समोर टाकतो की काय या भीतीने मी आवंढा गिळला.
“तरीही मी स्वामींना फारसे वाचत नाही. कारण ते मला पचणार नाहीत हे मला ठाउुक आहे.” मी पुन्हा हैराण!
“आपलं वाचन म्हणजे ज्वलंत. आंबेडकर, आगरकर, फुले. तर तू काय म्हणत होतास, रुम घ्यायची आहे ना तुला?” त्याने फुल्यांवरून डायरेक्ट रुमवर उडी मारली.
“अं? हो.”
“कुठे घेणार आहेस?”
“अजून ठरवायचे आहे.”
“कुठे घ्यायची तिकडे घे, पण फर्निचर अजिबात घेउु नकोस. आणि इंटिरियर करायला मला बोलव.”
अजिबात फर्निचर न घेतल्यावर कशाच्या इंटिरियरला त्याला बोलवायचे ते मला कळेना.
“जास्त खर्चात पडायला सोफा घेउु नकोस. गादी आणि उशा घे. मग हॉलमध्ये अशी गादी टाकायची. तिच्या इकडे एक उशी आणि तिकडे एक उशी अशी मांडायची.” असे म्हणत त्याने मध्ये प्लेट आणि बाजूला दोन बशा ठेवल्या.
“आणि वाटल्यास हा लोड.” पाण्याने भरलेला जग बशीच्या बाजूला आला. माझ्या समोरच्या उशीतल्या कपात चहा असल्यामुळे तो सांडण्याआधी तो मी पोटात सोडला. कुठल्याही विषयावर फुकटात सल्ला विचारायचा असेल तर मला कुठल्याही प्रकारे मध्ये न घेता त्याने माझ्या या कविमित्राला भेटावे.
उडप्याचे हॉटेल आणि त्याच्या बाजूचा बार ही त्याची प्रेरणास्थाने आहेत. याच अंधार्‍या बारमध्ये बसून त्याला अनेकवेळा जीवनाचा साक्षात्कार झाला आहे आणि त्या धुंदीतच त्याला बर्‍याच कविता व लेख आठवले आहेत. त्याला तंद्री लागली की वेटर बिचारे चणे शेंगदाणे देउुन कावतात. त्याच्या त्रासाला कंटाळून दुसर्‍या एखादया गिर्‍हाईकाला हाकलून बाहेर काढतात पण हा पडला समाजसुधारक कवी. कवीच्या नादी शहाण्याने लागू नये, हे त्या उडप्यांनांही कळते.
ते उडपी मात्र याची एखादया राजासारखी बडदास्त ठेवतात. हा हॉटेलमध्ये जाउुन बसला, की ते पोरे लोक त्याला गरम पाण्याचा ग्लास आणून देतात. थंड पाण्याचा ग्लास आणून दिला की हा त्यांच्यावर गरम होतो. सुरवातीला मला हे गरम पाण्याचे प्रकरण ठाउुक नव्हते. त्या पोर्‍याने त्याच्याबरोबर एकदा मलाही गरम पाण्याचा ग्लास आणून दिला. ते पाणी पिण्यासाठी होते ते मला हात धुतल्यावर समजले. त्याचा सूड म्हणून की काय त्यानंतर त्याने मला थंड चहा आणून दिला.
हॉटेलमध्ये त्याचा एक ठरलेला टेबल आहे. तिथे जाउुन बसल्यावर जो वेटर त्याला “काय आणू?” म्हणून विचारायला येईल त्याला बाजूच्या टपरीवरून आधी सिगरेट आणायला लागते. म्हणून तो येउुन बसल्यावर पाचदहा मिनिटे पाणी ठेवणार्‍याखेरीज कोणीच येत नाही. पाणीवाला येउुन पाणी ठेउुन जातो आणि आॅर्डरवाला आॅर्डर घ्यायच्या आधी याला सिगरेटी देतो.
त्याने माझा एवढा छळ करूनदेखील मला मध्यंतरी त्या हॉटेलमध्ये जायला आवडायचं. प्रिती झिंटाला लाजवेल अशी गालावरची खळी घेउुन एक अिद्वतीय वस्तू तिच्या फडतुस गुरुबरोबर आमच्या वेळेतच चहाला यायची. हा गुरु थेट एखादया साउुथ इंडियन रामण्णा किंवा मुरगाप्पासारखा दिसायचा. पंख्याच्या वार्‍याने उडणारे तिचे ते काळेभोर कुंतल, गुलाबाची पाकळी कुठल्याही कसबी कारागीराला ज्या आकारात कापता येणार नाही असे ओष्ठ, चाफेकळी कसली असते ते ठाउुक नाही, पण जशी असेल असे वाटते तसे तिचे नाक, कुठल्याही गरुडाकडे पाहिलं तर तो उडता उडता कोसळून पडेल अशी नजर, एवढी सगळी स्फोटक सामुग्री (अजूनही वर्णन करण्यासारखे बरेच काही आहे, पण मज पामराला तेवढे आलंकारिक शब्द येत नसल्यामुळे ­ शिक्षाण कमी झालं असल्यामुळे म्हणा हवं तर ­ इथे एवढेच पुरे) घेउुन ती खुर्चीत बसलेली असायची.
चहाच्या टेबलावर बसल्या बसल्या त्यांचा क्लास सुरू होत असे. उडप्याचे ते टेबल म्हणजे त्या गुरुशिष्येचे हॉटेल कम क्लासरुम होते. हे उडपी लोक बर्‍याच लोकांना भरपूर सूट देतात याचा मी तिथे अभ्यास केला. शॉर्टहॅण्डच्या नावाखाली रोज हॉटेलचा गल्ला वाढत होता. तो गुरु तिला उर्दु शिकवायचा की शॉर्टहॅण्ड हे शेवटपर्यत कळाले नाही. तिला तरी समजायचे की नाही देव जाणे. पण हॉटेलमधल्या कुठल्यातरी टेबलावरचे चार डोळे (मला चष्मा आहे हे जाणकारांना सांगायला नकोच) अधूनमधून आपल्याकडे असतात हे निर्झरासारख्या खळाळणार्‍या हास्यातून जाणवायचे. परवाच एक कादंबरी वाचली म्हणून या सगळ्या उपमा सुचल्या.
मी तिला खळी म्हणायचो. कधी कधी हॉटेलमध्ये गेल्यागेल्या “अरे, तुझी खळी आत्ताच गेली.” अशी माहिती मिळायची आणि पुढचा वेळ बैठक मोडण्याच्या विवंचनेत जायचा. अशा एखादया हॉटेलमध्ये, बसस्टॉपवर, बसमध्ये, लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासात एखादीकडे बघायचेच नाही असं लाखवेळा ठरवलं तरीदेखील आपला विश्वामित्र व्हायला वेळ लागत नाही.

क्रमश:


©विजय माने, ठाणे.