खळाळून हसायला लावणारे ‘एक ना धड’ आता नव्या डिजिटल रुपात…

Ek Na Dhad Cover

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आजपर्यंत फक्त पेपरकॉपीमध्ये उपलब्ध असलेले ‘एक ना धड’ हे माझे पहिले पुस्तक नुकतेच अमेझॉन किंडलवर प्रकाशित झाले आहे. त्यातल्या प्रस्तावनेचा काही भाग खाली देत आहे. ज्यांनी अद्याप हे पुस्तक वाचले नाही त्यांनी अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया लिहायला विसरु नका. खालील लिंकवरून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

https://www.amazon.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1-Vijay-Mane-ebook/dp/B08BVSJV4Z/ref=sr_1_2?dchild=1&keywords=ek+na+dhad&qid=1593350486&sr=8-2

डिजीटल आवृत्तीच्या निमित्ताने…

फेसबूक, इन्स्टा, झूम आणि टीम्सच्या आजच्या युगात पेपर पुस्तकाचे स्थान नाही म्हटले तरी पहिल्यापेक्षा कमी झाले आहे हे कुणालाही पटेल. असे असले तरी  मराठी वाचक मात्र कमी झालेला नाही. पण या परिस्थितीत वाचकापर्यंत चांगले पुस्तक पोहोचविणे खरोखर जिकीरीचे काम झाले आहे त्याला अनेक कारणे आहेत. पण चांगल्या वाचकापर्यंत पोहोचायचे असेल तर डिजीटल माध्यमांना पर्याय नाही हे देखील तेवढेच सत्य आहे.

वीस वर्षापूर्वी लिहीलेले हे पुस्तक साधारण बारा वर्षापूर्वी प्रकाशित झाले. अगदी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ म्हणून २००८ ला महाराष्ट्र शासनातर्फे त्याचा गौरवदेखील झाला पण वितरण आणि इतर अनेक गोष्टी यामुळे ते सर्वत्र पोहोचविता आले नाही. टेक्नॉलॉजीचा असाही कधी उपयोग होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

माझे खूप जवळचे मित्र आणि ‘इंडोनेशायन’, ‘कंबोडायन’ व ‘चमचाभर जिंदगी’ या पुस्तकांचे लोकप्रिय लेखक श्री. रवी वाळेकर यांना त्यांच्या अमेरिकेतील चाहत्यांचे पुस्तक मिळत नाही म्हणून मेल व मेसेजेस येत होते. शेवटी खूप प्रयत्न करून त्यानी त्यांच्यासाठी पुस्तके पाठविण्याची व्यवस्था केली पण त्यासाठी येणारा खर्च पुस्तकाच्या किंमतीपेक्षा आधिक होता म्हणून त्यांनी पुस्तकांच्या डिजीटल आवृत्तीचा निर्णय घेतला.

माझ्या या पुस्तकाच्या डिजीटलायझेशनची प्रेरणा म्हणाल तर रवीसाहेबच! हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचविण्यातदेखील त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आजच्या आधुनिक युगात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने पुस्तक मिळविण्यासाठी वितरण वगैरे भानगडीचा प्रश्नच येणार नाही. काही क्लिक्स केल्या की आवडते पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये हजर! तुमच्या सवडीने तुम्ही ते कधीही वाचू शकता. एवढे साधे आणि सोपे समीकरण आहे.

माझे हे पहिलेवहिले साहित्यरुपी अपत्य तुम्हांला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. आजच्या धावपळीच्या या लाईफमध्ये ‘एक ना धड’ ने तुम्हांला थोडाबहूत आनंद दिला तर मी माझ्या लिखाणाचे सार्थक झाले असे मानेन. लेखनाबद्दलचे तुमचे काही बरे वाईट अभिप्राय असतील तर अवश्य कळवा.

आपला,

विजय माने.