तुझ्याविना # २

2

इलाविया कॉर्प ही ट्रान्सफॉर्मर उद्योगातली चाळीस वर्षाची ख्यातनाम कंपनी होती. इलेक्ट्रिकल कॉईल्स आणि पॉवर सप्लाईज असा उल्लेख आला की पहिले नाव इलावियाचे यायचे. कंपनीचे पूर्ण भारतात जाळे होते. जवळजवळ सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात कंपनीच्या शाखा होत्या. तिथे सेल्स आणि सर्व्हिसचे काम चालायचे. मुंबईत मटेरियल तयार व्हायचे आणि ते ऑर्डरनुसार मग सगळीकडे पाठवले जायचे. एकंदरीत कंपनी खूप छान होती. एकतर मला ‘रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट’ मध्ये काम करायला मिळणार होते शिवाय इतर कंपन्यांच्या तुलनेत इथे सॅलरीही चांगली होती. म्हणून जेव्हा माझे कॅम्पस सिलेक्शन झाले त्यावेळी सगळ्या मुलांनी माझे अभिनंदन केले. सगळेजण इथे सिलेक्ट व्हायला आसूसले होते.
कंपनीने फक्त स्वत:च्या फायद्याचाच विचार करत नव्हती. त्यांच्या पॉलिसीमध्ये समाजासाठी खूप बांधिलक्या घालून घेतल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे कॅम्पस सिलेक्शन करून थेट कॉलेजमधूनच नवीन इंजिनियर्स घ्यायचे. नवीन विचारांच्या टॅलेंटला संधी देऊन कंपनी आणि इंजिनिअर या दोघांनाही फायदा होईल असा समन्वय साधायचा असे साधे सुत्र होते. त्यासाठी फायनल एक्झामआधी कंपनीचे एचआर आणि ट्रेनिंग सेंटरवाले आधिकारी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे एक्झाम आणि इंटरव्युव्ह घ्यायचे आणि मुलांचे सिलेक्शन व्हायचे. सिलेक्ट झालेल्या फायनल परिक्षेत मुलांना फर्स्ट क्लास मिळवण्याची सक्ती असयाची. फर्स्ट क्लास नाही मिळाला तर झालेले सिलेक्शन रद्द व्हायचे. सिलेक्ट झालेल्या मुलांना कंपनीकडून एक वर्षाची ट्रेनी इंजिनियर ही पोस्ट मिळायची. वर्षभर त्याचा परफॉर्मन्स पाहून जर तो खरोखर होतकरु असेल आणि त्याला घेण्याने कंपनीचा फायदा होण्यासारखे असेल तर ट्रेनीशिपचा अवधी संपल्याबरोबर लगेच त्याला परमनंट करत असत. म्हणून एकदा इथे सिलेक्ट झाले की नोकरीचा प्रश्न जवळजवळ सुटल्यासारखा असायचा. म्हणून सगळ्या मुलांना ही कंपनी हवी असायची.
एकदिवशी सकाळसकाळीच हे आधिकारी कोणतीही पूर्वसुचना न देता आमच्या पुण्याच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. एका अर्थाने ते बरे झाले. मला सरप्राईज टेस्ट्स नेहमीच आवडत आलेल्या आहेत. जे काही व्हायचे असेल ते लगेच होऊन जाते. पण तेच आधी सांगितले की काही विचारायला नको. तोच तोच अभ्यास, त्याची पुन्हा पुन्हा तयारी करून मी तर बोअर होऊन जातो. त्या टेंशनमध्ये आपण ज्या परिक्षेत विचारल्या जाणार नाहीत अशा बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करण्यात वेळ घालवतो. मी कितीतरी पेपर आदल्या दिवशी अभ्यास करून सोडवले आहेत. वास्तविक त्याचे एक साइंटिफिक सिक्रेट आहे, आज वाचलेल्या माहितीचा जवळजवळ ऐंशी टक्के भाग चोवीस तास आपल्या मेमरीत तसाच उपलब्ध असतो. त्यानंतर खूप गतीने तो आपण विसरत जातो. हे साइंटिफिक सिक्रेट जवळजवळ सगळ्या इंजिनियर लोकांना माहित आहे त्यामुळे ते जास्तीजास्त अभ्यास पेपराच्या आदल्या दिवशी करतात.
वर्षभर अभ्यास नसला केला तरी आदल्या दिवशी मात्र मी करायचोच. हा ताजा अभ्यास मला पेपर सोडवायला खूप मदत करायचा. एकदा पेपर हातात आला की मग तो भराभर उतरून काढायचो की डोक्यातली जड झालेली माहिती विसरायला मोकळा! एकदा ती माहिती पेपरावर उतरली की बात खतम. मग दुसर्‍या पेपरचे टेंशन घ्यायचे. पुन्हा झालेल्यावर चर्चा करायची नाही, हा नियम मी मला घालून घेतला होता. आमच्या वर्गात इमाने इतबारे वर्षभर अभ्यास करणारेही होते पण पेपराच्या आधी पुरेसा अभ्यास न केल्यामुळे त्यांना केटी लागलेल्या होत्या. त्यामुळे साधारण इंजिनियरला पेपराच्या आधीचा दिवस टाईमपास करणे अजिबात परवडत नाही. तो दिवस त्याच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा दिवस असतो.
सुरवातीला आम्हांला लेखी परिक्षा द्यायची होती. सोपी गणिते होती, चार पर्यायातून एक पर्याय निवडायचा होता. पण ती सोडवायला वेळ खूप कमी होता. शिवाय निगेटीव्ह मार्कींग सिस्टीम होती. म्हणजे एखादे उत्तर चुकीचे असेल तर तेवढे मार्क्स कमी व्हायचे. त्यामुळे थापा मारून उपयोग नव्हता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे इंटिग्रेशन वगैरे नाही हे पाहिल्यावर जीव भांड्यात पडला. इंटिग्रेशनने या प्रकाराने आमच्या सर्वांचा जीव काढला होता. त्यामानाने त्याचा सावत्र भाऊ डेरिवेटीव बरा होता. पण इंटिग्रेशन हे डेरिवेटीवच्या एकदम उलट असल्याने ते शिकताना माझे डेरिवेटीव ही विसरायला लागले. या इंटिग्रेशनने एवढा वैताग आणला होता की मी ते सोडवायला घेतले आणि पान भरून ते सोडवले की येणारे उत्तर हे विचारलेले मुळ उदाहरणच असायचे. शेवटी शेवटी त्या सापासारख्या दिसणार्‍या इंटिग्रेशनच्या चिन्हाची भीती वाटायला लागली. अभ्यासही असा होता, एक इंटिग्रेशन सोडवता सोडवता नाकी नऊ यायचे आणि आम्हांला डबल आणि ट्रिपल इंटिग्रेशन होते. पण चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर त्याच्या तावडीतून एकदाचे सुटलो.
हा गणिताचा पेपर सोडवून झाल्यावर आम्हांला ‘ई-कॉमर्स’ या विषयावर एक निबंध लिहायला सांगण्यात आला. आम्ही त्याचे प्रकार, फायदे व उदाहरणे देऊन तो चांगल्यापैकी लिहीला. त्यानंतर आम्हांला लंचसाठी सुट्टी देण्यात आली आणि लंचनंतर एका क्लासरुममध्ये जमायला सांगितले. लंच करून आम्ही परत आलो तर तिथे परीक्षा दिलेले सर्वजण जमले होते. कंपनीचे आधिकारी निकाल जाहीर करायला तयार होते.
आमच्या कॉलेजमधल्या आठ मुलांनी ही टेस्ट क्लीअर केली होती आणि मी त्यातला एकजण होतो. आम्हा आठजणांना पुढची टेक्निकल टेस्ट द्यायची होती. माझी इलेक्ट्रॉनिक्स विषयांवर चांगलीच पकड असल्याने या टेक्निकल टेस्टचा काही प्रॉब्लेम नव्हता. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर किंवा इंटिग्रेटेड सर्किट्स काहीही विचारु देत, तो माझा प्रांत होता. त्यामुळे कसलीही चिंता नव्हती. आठमधून आम्ही पाचजण पुढे गेलो आणि इंटरव्युव्हनंतर तीनच उरले. विषेश म्हणजे मी ही त्यात होतो!
ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मागच्याच वर्षी आमचा एक सिनियर आशिष इलावियासाठीच सिलेक्ट झाला होता हे मला समजले. मी त्याला पर्सनली ओळखत नसलो तरी चेहर्‍यावरून ओळखले असते. पण राहून राहून हे नाव कुठेतरी ऐकले आहे असे सतत वाटत होते. त्यावेळी आयटी सेक्टर बूममध्ये होता आणि माझ्याबरोबर इलावियामध्ये जे दोघे सिलेक्ट झाले होते, ते इलावियानंतर आलेल्या इन्फोसिसच्या टेस्टला बसून तिकडेही सिलेक्ट झाले. त्यांना आयटीमध्ये जायचे होते म्हणून त्यांनी इन्फोसिसला पसंती दिली आणि इलावियासाठी मी एकटाच उरलो. मला मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करायचे होते आणि इलावियापेक्षा दुसरी चांगली संधी मिळाली नसती म्हणून माझा निर्णय पक्का होता.
इलावियाचा इंडियन मार्केटमध्ये चांगला शेअर होता एवढेच नाही तर त्यांच्या प्रॉडक्टसाठी लोक मागेल तेवढे पैसे देत होते. कंपनी प्रॉडक्ट क्वालिटीबाबत एवढी जागरुक होती की त्याच्याशी संबंधित काहीही प्रॉब्लेम येऊन प्रॉडक्टमध्ये बिघाड आला तर कस्टमरला काहीही प्रश्न न विचारता फ्री रिप्लेसमेंट द्यायची पॉलिसी होती. कस्टमर काय म्हणतोय तो मुद्दा पहिला आणि बाकीचे नंतर असे असल्याने कंपनीने सर्वत्र विश्वास संपादन केला होता.
ठाण्याजवळच असलेल्या मुलुंडमध्ये कंपनीचे हेड ऑफिस आणि चार डिव्हीजन होते. ट्रान्सफॉर्मर, स्विचगिअर, वॉटरपंप्स आणि कॉर्पोरेट. माझे सिलेक्शन ट्रान्सफॉर्मर डिवीजनसाठी झाले होते. खूप उच्च प्रतीचे ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर सप्लाय हे आमचे मुख्य प्रॉडक्ट होते. त्यात माझा रोल असिस्टंट प्रॉडक्ट डिझाईनर म्हणून होता. पॉवर सप्लायमध्ये लागणारे सर्किट डिझाईन करून त्याचे प्रॉडक्टमध्ये फायनल टेस्टिंग करेपर्यंत आमचे काम होते. तसे संपूर्ण प्रॉडक्ट डिझाईन करायला स्वतंत्र डिझाईन टीम होती. ते प्रॉडक्ट कसे दिसायला हवे, कोणता पार्ट कोणत्या ठिकाणी जोडायला हवा, वर लावलेले स्टीकर कसे आकर्षक आणि माहितीयुक्त हवे या सर्व गोष्टींचा विचार करून ते डिझाईनिंग करत असत. आम्ही डिझाईन केलेले पार्ट्स हे बाहेरून न दिसता प्रॉडक्टच्या आत बसवलेले असत.
प्रॉडक्ट कसे हवे याचा सर्व्हे करायला एक टीम होती. ते ठिकठिकाणी जाऊन सर्व्हे करत आणि प्रॉडक्टमध्ये कशाप्रकारे सुधारणा करता येईल किंवा कोणते नवीन प्रॉडक्ट बनवायचे हे मार्केटिंग टीमला सांगत असत. मग मार्केटिंग टीम मागणीनुसार पुढे काय करायचे ठरवत असे. प्रॉडक्ट बनवायचे असेल तर मार्केटिंग आणि आमच्या वरचेवर मिंटींग होऊन त्यातून नवीन प्रॉडक्ट जन्मास येई. एकदा ते प्रॉडक्ट तयार झाले की एखाद्या मोठ्या कार्यक्रमात त्याचे लाँच होई. मग ऑर्डरप्रमाणे ते पाठवले जाई. आमच्या चॅनल पार्टनरना प्रॉडक्टचे ट्रेनिंग द्यायला मात्र आम्हांला जावे लागत असे. कुठल्याही प्रॉडक्टचा जन्म ते कस्टमरपर्यंतचा प्रवास साधारणपणे हा असा असतो.

कंपनी जॉईन केल्यावर सुरवातीचा आठवडा ट्रेनिंगचा होता. त्यात खूप सार्‍या गोष्टी होत्या. अगदी कस्टमरशी कसे वागावे इथपासून कंपनीच्या शॉपफ्लोअरवर काम करणार्‍या कामगाराची मानसिकता समजून घेऊन त्याच्याकडून हवे तसे प्रॉडक्शन काढून घेणे वगैरे. स्वत:ची कॉलनी नसल्याने कंपनीने आम्हा नवीन जॉईन झालेल्या लोकांसाठी दोन आठवड्यांसाठी हॉटेल बुक केले होते. त्यानंतर प्रत्येकाने रहायची व्यवस्था स्वत: पहायची होती. माझा कुणीही मित्र किंवा नातेवाईक मुंबईत नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी रहायची व्यवस्था पहाणे हे थोडे अवघड काम होते. तरीही ट्रेनिंगच्या काळात दिल्लीवरून आलेल्या तिघांशी माझी ओळख झाली आणि अगदीच कुठे जागा मिळाली नाही तर आपण चौघेजण अॅडजस्ट करून राहू असे ते म्हणाले होते.
डोक्यातल्या ‘रहायच्या व्यवस्थेचा प्रश्न’ हा एक विषय सोडला तर एकंदरीत ट्रेनिंग चांगले होते. ट्रेनर्सनी इलाविया कोणकोणत्या बिझनेसमध्ये आहे इथपासून सुरवात करून, कंपनीची समाजाशी बांधिलकी, निसर्गासाठी करत असलेले अनोखे प्रोजेक्ट्स, कंपनीचे नियम, कंपनीच्या आवारात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सगळ्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले. नैतिकतेच्या बाबतीत कंपनीचे काटेकोर नियम होते. ते तोडलेले अजिबात चालत नसे. काहीही झाले तरी कोणत्याही प्रकारे सरकारचा टॅक्स बुडता कामा नये अशी थेट डायरेक्टर साहेबांची सर्वांना सूचना होती. एकुणएक व्यव्हार पारदर्शक असला पाहिजे अशी सर्वांना सक्त ताकीद होती. त्यात कसलाही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही हे ट्रेनिंगमध्येच सर्वांच्या मनात कोरले गेले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
वेगवेगळ्या बिझनेसनुसार प्रत्येक डिवीजनसाठी कॉर्पोरेटच्या काही गाईडलाईन्स होत्या. त्या व्यवस्थित पाळल्या जाताहेत की नाही हे तपासायला स्वतंत्र ऑडिट टीम होत्या. रोजच्या व्यव्हारात नियम डावलून कोणतेही शॉर्टकट्स घेतले जात नाहीत हे वरचेवर तपासले जाई.
माझ्यासाठी म्हणाल तर हे ट्रेनिंग दुसर्‍या एका खास कारणासाठी फायदेशीर ठरले. स्विचगिअर डिव्हीजनमध्ये सिलेक्ट झालेल्या एका अप्रतिम सौंदर्याला एक आठवडा रोजच्या रोज पहाता आले. आमच्या बरोबर इलावियामध्ये सिलेक्ट झालेली ती एकुलती एक इंजिनिअर मुलगी होती. नेहमी पहिल्या रांगेत बसायची. आम्ही सर्वजण तिच्याकडेच पहात रहायचो. दोनतीन पुस्तकी किडे सोडले तर आम्ही तो आठवडा ट्रेनिंगबरोबर तिच्याकडे पहाण्यात घालवला. पुस्तकी किडे तर तिच्या बाजूला बसूनही समोर पहायचे. वास्तविक ते नॉर्मल लोक नव्हतेच. कोणत्याही सुंदर मुलीकडे लक्ष जाणे ही गोष्ट नॉर्मल या प्रकारात मोडते. ती मुलगी बाजूला बसलेली असताना समोर लक्ष न लागणे ही तर त्याहूनही नॉर्मल गोष्ट! पण हे लेकाचे असे, काय बोलणार! असे बावळे लोक तर मुलींनाही आवडत नाहीत.
ट्रेनिंगसाठी आलेल्या वीसजणांना मी चांगलाच लक्षात राहिलो होतो. त्याला माझा बावळटपणा कारणीभूत होता. ट्रेनिंगच्या पहिल्याचदिवशी आम्हाला एका ट्रेनिंगरुममध्ये बसायला सांगितले. ट्रेनर मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकल्याने आम्हाला अर्धा तास वाट पहावी लागेल असे सांगण्यात आले. तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी आम्हांला चहा बिस्किटे देण्यात आली. दरम्यान आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. अर्धा तास उलटला तरी ट्रेनर येण्याचे चिन्ह दिसेना. आम्ही पुन्हा ट्रेनिंगरुममध्ये आमच्या जागेवर येऊन बसलो. पाऊणतास झाला असेल, खाडकन दरवाजा उघडला आणि गडबडीत रुमालाने कपाळावरचा घाम टिपत ट्रेनर आत आले.
जसे अचानक ते आत आले तसे पटकन आम्ही उठून उभा राहिलो आणि सर्वांनी त्यांना गुडमॉर्निंगने ग्रीट केले.
“वेरी गुडमॉर्निंग गाईज…” हातातले एक कसलेतरी पुस्तक टेबलावर ठेऊन स्मितहास्य करत त्यांनी आमच्याकडे नजर टाकली आणि पहिल्या रांगेतल्या मुलीवर नजर पडताच, “अॅन्ड ब्युटीफुल लेडी.” असे म्हणून त्यांनी आपले वाक्य पूर्ण केले. तिचा चेहरा समोरून दिसत नसला तरी तिच्या एकटीसाठी ‘ब्युटीफुल लेडी’ असा उल्लेख केल्याने लाजेने गोर्‍यामोर्‍या झालेल्या तिच्या चेहर्‍यावरची लाली माझ्या नजरेतून सुटली नाही. पोरी खरंच लाजल्या की जाम क्युट दिसतात.
ट्रेनरनी लेट आल्याबद्दल पहिल्यांदा सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना बसून घ्या असा हातानेच सिग्नल दिला. माझ्याशिवाय सगळेजण खुर्चीत बसले आणि मी कसा कोण जाणे, अचानक धडपडून पडलो. पडलो ते ठीक होते पण मोठा आवाज झाला. खाली बसताना माझे लक्ष खुर्चीवर नव्हते. पहिल्या रांगेतल्या तिच्याकडे पहातच खाली बसत होतो. बसायला पिक्चर थियेटरमध्ये असतात तशा आरामखुर्च्या होत्या. उठून उभा राहिल्यावर त्या आपोआप फोल्ड व्हायच्या. मी उठल्यावर ती तशीच फोल्ड झालेली. तिचा बेस नीट करून बसायचे होते पण बसण्यावर लक्ष नसल्याने मी तसाच बसलो आणि माझी फजिती झाली. मी धांदरटासारखा अशा अवस्थेत पडलो होतो की सर्वजण हसायला लागले.
मला खूप लाजल्यासारखे झाले. सर्वांसमोर अशा प्रकारचा अपमान झाल्यावर काय होते, ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. मला धड उठताही येईना. अजिबात वेळ न घालवता लगेच तिथून बाहेर पडावे असे मन म्हणू लागले. निदान इथे जमलेल्या वीसजणांना तरी आपला चेहरा दाखवू नये असे वाटत होते. पण काहीतरी गडबड झाल्याचे ट्रेनरच्या लक्षात आल्यावर ते धावतच माझ्याकडे आले. मला हात देऊन त्यांनी उठवले, खुर्चीचा बेस नीट करून त्यात मला बसवले आणि पाणी प्यायला दिले. सगळ्यांना शांत रहा असे सांगून त्यांनी इलावियामध्ये त्यांच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला. शिवाय असा काही संकटाचा प्रसंग कुणावर आलाच तर त्याच्यावर न हसता समोरच्याला पटकन मदत करायला हवी असा संदेश त्यांनी सर्वांना दिला.
पहिल्याच दिवशी वॉशरुमच्या पारदर्शक काचेला डोके आपटून त्यांच्या कपाळावर तीन टाके पडले होते. वॉशरुमच्या दरवाजाची काच एवढी पारदर्शक होती की मुळात तिथे काच आहे हे लक्षात न आल्याने त्यांच्यावर तो प्रसंग ओढवला होता. त्यावर खूप वर्षे लोटली होती. इलावियाचे ते परमनंट ट्रेनर होते पण कपाळावरच्या तीन टाक्यांची खूण तशीच होती, ती त्यांनी सर्वांना दाखवली. त्यांची गोष्ट ऐकल्यावर जरा बरे वाटले. अशा प्रसंगात एकटाच असेल तर आपणच आपल्याला बावळट वाटायला लागतो पण तसे नव्हते. त्यानंतर सर्वांचे इंट्रोडक्शन झाले. त्यावेळी मी सांगितलेले माझे नाव कुणीही विसरणार नाही याची मला खात्री होती. तशी चोख व्यवस्था मी करूनच ठेवली होती. या सगळ्या घोळात पहिल्या रांगेत बसलेलीचे नाव आर्या आहे हे समजले. हे नाव माझे पुढचे सगळे आयुष्य बदलून टाकणार आहे याची त्यावेळी मला पुसटशीही कल्पणा नव्हती.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.

Author: Vijay Mane

आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : lekhakvijay@yahoo.com

Leave a Reply